Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रकोरेगाव भीमा प्रकरणः मिलिंद एकबोटेला काळं फासण्याचा प्रयत्न

कोरेगाव भीमा प्रकरणः मिलिंद एकबोटेला काळं फासण्याचा प्रयत्न

पुणेः कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेला न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. तो नेमका कोण आहे, कुठल्या संघटनेशी संबंधित आहे, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, मिलिंद एकबोटेला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भीमामध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोप ठेवत १४ मार्च रोजी मिलिंद एकबोटेला अटक करण्यात आली होती. मिलिंद एकबोटेचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर मिलिंद एकबोटेला न्यायालयात हजर करण्यात आल्यावर १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली होती.  पुणे सत्र न्यायालयाने २२ जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. पण उच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

काय आहे प्रकरण
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये सोमवारी १ जानेवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.  दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments