Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी पक्षाची गळती सुरुच, बार्शीचे आमदार दिलीप सोपल सेनेत

राष्ट्रवादी पक्षाची गळती सुरुच, बार्शीचे आमदार दिलीप सोपल सेनेत

बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सोमवारी सकाळी जाहीर केले. सोपल यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला जबर हादरा बसला आहे. विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व रश्मी बागल यांच्यानंतर सोपल यांनीही सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पडले आहे.

सोपल हे उद्या, मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. २८ ऑगस्ट रोजी मातोश्री येथे निवडक कार्यकर्त्यांच्या समवेत सोपल शिवबंधन बांधून ‘जय महाराष्ट्र’ म्हणतील. मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप सोपल यांच्या खेळीने माजी आमदार राजेंद्र राऊत यांची कोंडी झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांतील गळती सुरू आहे. राजकारणातील वाऱ्यांचा अंदाज घेऊन दिलीप सोपल हेही शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा काही महिन्यांपासून होती. सोपल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ‘सोपल आमच्या बरोबर आहेत,’ असे खुद्द पवार यांनी मध्यंतरी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू होती. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सोपल यांनी पक्षांतराचा अंदाज घेतला होता. कार्यकर्त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने सोपल यांनी शिवसेनेत जाणार असल्याचे जाहीर करून चर्चांना पूर्णविराम दिला.

लोकसभा निवडणुकीआधी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनीही चिरंजीवांची वाट धरली. गेल्या आठवड्यात करमाळा येथील राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी हातात शिवबंधन बांधले. पाठोपाठ सोपल शिवबंधन बांधणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष खिळखिळा झाला आहे.

‘शिवसेनेत प्रवेश करावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीचा रेटा असल्याने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. आगामी निवडणूक शिवसेनेकडून लढविणार आहे. शिवसेना विरुद्ध भाजप की आणखी कोणी या जर तरच्या चर्चा मी करणार नाही. शिवसेनेकडून निवडणूक लढवायची आहे, हेच मला कळते,’ असे दिलीप सोपल म्हणाले.

दरम्यान, युतीच्या वाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने सोपल हे शिवसेनेकडून लढणार हे स्पष्ट आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपवासी झालेले माजी आमदार राजेंद्र राऊत यापुढे आता आव्हान निर्माण झाले आहे. त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे. युती झाली नाही तर शिवसेना विरुद्ध भाजप अशी निवडणूक होऊ शकते. युती झाली तर राऊत हे सोपल यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments