Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeदेशअभिनंदन : औरंगाबाद- मुंबईच्या ‘या’ दोन बालविरांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार!

अभिनंदन : औरंगाबाद- मुंबईच्या ‘या’ दोन बालविरांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार!

नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. महाराष्ट्रातल्या दोन बालवीरांचा यात समावेश आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून १७ जणांची सुखरूप सुटका केली होती. आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीला वाचवलं होतं. देशभरातून २२ मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात १० मुली तर १२ मुलांचा समावेश होता.

या दहा वर्षांच्या झेननं वाचवली होती सतरा आयुष्यं…

गेल्यावर्षी २२ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी मुंबईतील परळ येथील क्रिस्टल टॉवर या १७ मजली इमारतीला आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता तर १६ जण जखमी झाले होते. १६ व्या मजल्यावर राहणाऱ्या झेनच्या घरातही आगीचा धूर पसरला. शेजारीपाजारीही किंचाळत बाहेर निघाले. पण काही जण धुरामुळे घुसमटू लागले. झेनने त्यांना घाबरून जाऊ नका असा सल्ला ते जेथे धूर कमी होता अशा ठिकाणी नेलं. तिने मेस स्विच बंद केला आणि फायर ब्रिगेडला तेथे येण्याची सूचना दिली. अग्निशमन दलाचे जवान तासाभराने तेथे पोहोचले. पण तोपर्यंत तेथे थांबलेल्या १७ जणांना तिने टॉवेल ओले करून त्याचा विशिष्ट पद्धतीने मास्कप्रमाणे वापर करून श्वासोच्छवास करण्यास सांगितला. त्या सर्व नागरिकांनी झेनचा सल्ला मानला आणि धूर असूनही ते सर्व गुदमरून गेले नाहीत. शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकलेली गोष्ट तिने अंमलात आणून सर्वांचे प्राण वाचवले होते. झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायालयातील वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांची मुलगी आहे.

आकाश खिल्लारेने नदीत बुडणाऱ्या मायलेकींचा वाचवला होता जीव…

आकाश खिल्लारे या १५ वर्षांच्या मुलाने त्याच्या गावच्या नदीत बुडणाऱ्या मायलेकींचा जीव वाचवला. औरंगाबादमधील त्याच्या गावातून तो शाळेत जात होता. तेथे दुधना नदीत त्याला जीव वाचवण्यासाठी ओरडणाऱ्या महिलेचा आवाज ऐकू आला. आकाशने आपले दप्तर तिथेच टाकले आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ७० फूट खोल नदीत उडी घेतली. तो त्या महिलेजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की तिच्यासोबत एक लहान मुलगीही होती. त्याने आधी मुलीला वाचवले आणि पुन्हा नदीत उडी घेऊन महिलेलाही सुरक्षितपणे पाण्याबाहेर आणले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments