अखेर…परेश रावल यांनी हटवले बारवाला-चायवाला ट्विट, मागितली माफी!

- Advertisement -

नवी दिल्ली – भारतीय युवा काँग्रेसच्या ‘युवा देश’ या ऑनलाईन नियतकालिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अपमानास्पद ‘मीम’ तयार केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या एका एकत्रित छायाचित्रात संभाषणाचे मीम तयार करण्यात आले होते. यात थेरेसा मे मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘तुम्ही चहाच विका’ असे अपमानास्पद बोलत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे चित्र ट्विटरच्या माध्यमांतून व्हायरल करण्यात आल्यानंतर त्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला. त्यानंतर काँग्रेसकडून तातडीने हे ट्विट डिलीट करण्यात आले.

काँग्रेसच्या या ट्विटचा समाचार घेताना अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार परेश रावल यांनी मध्यरात्री ट्विट केले होते. मात्र त्यांच्या ट्विटला होणारा विरोध लक्षात येताच त्यांनी आपले ट्वीट हटवले आणि माफी मागितली.

- Advertisement -

रावल यांनी तुमच्या ‘बारवाला’पेक्षा आमचा ‘चायवाला’ जास्त चांगला आहे अशा आशयाचे ट्वीट केले होते. मात्र नंतर त्यांनी हे ट्वीट हटवले. ट्विट हटवल्यानंतर परेश रावल यांनी लिहिले की, मी ट्विट हटवले आहे. लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागतो. नंतर जेव्हा एका युजरने त्यांना ट्विटऐवजी ट्विटर अकाऊंटच डिलीट करण्याचा सल्ला दिला, तेव्हा परेश रावल यांनी सांगितले की, काँग्रेसचे अकाऊंट  डिलीट झाल्यावर माझे ट्विटर अकाउंट आपोआप डिलीट होईल.

दरम्यान, काँग्रेसच्या अधिकृत नियतकालिकाच्या ट्विटर हँडलवरुन हे मीम प्रसिद्ध झाल्याने भाजपचे नेतेही खवळले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस पाठवून देशाच्या प्रमुखाबद्दल अशा अपमानास्पद प्रकाराला परवानगी कशी दिली असा जाब विचारला आहे.

- Advertisement -