अभिनेत्री नीतू चंद्रा सिद्धार्थ मल्होत्रावर संतापली!

- Advertisement -

सगळे विनोद हसवणारे नसतात. काही काही विनोद चांगलेच महागात पडतात. सिद्धार्थ मल्होत्राला कदाचित हे कळून चुकले असावे. होय, आपल्या एका अशाच ‘जोक्स’साठी सिद्धार्थला माफी मागावी लागलीयं. आता हा काय मामला आहे, हे आम्ही तुम्हाला सांगतो. हा सगळा मामला आहे तो, ‘बिग बॉस11’ दरम्यानचा. होय, या शोमध्ये सिद्धार्थ आणि मनोज वाजपेयी हे दोघे त्यांचा आगामी चित्रपट ‘अय्यारी’च्या प्रमोशनसाठी आले होते. पण या प्रमोशनच्या नादात सिद्धार्थने भोजपुरी भाषेची टर उडवून टाकली. प्रमोशनदरम्यान सलमान खानने सिद्धार्थला भोजपुरी भाषेत एक डायलॉग म्हणायला दिला. सिद्धार्थला भोजपुरी येत नसलेली पाहून सलमानने मनोजला त्याची मदत करायला सांगितले. मनोजने सिद्धार्थला भोजपुरी संवाद शिकवणे सुरु केले अन् हे काय, सिद्धार्थने भोजपुरीची तुलना चक्क लॅट्रिनशी करून टाकली. हा भोजपुरी डायलॉग म्हणताना मला लॅट्रिनसारखी फिलिंग येतेयं, असे सिद्धार्थ यावेळी म्हणाला. एकदा नाही तर दोनदा म्हणाला.


सिद्धार्थने भोजपुरीची अशी टर उडवणे अभिनेत्री नीतू चंद्रा हिला अजिबात आवडले नाही. तिने सिद्धार्थला चांगलेच आडव्या हातांनी घेतले. तुझ्यासारख्या इतक्या मोठ्या कलाकाराने नॅशनल टीव्हीवर भोजपुरीची खिल्ली उडवणे, लज्जास्पद आहे, अशा शब्दात नीतू चंद्राने सिद्धार्थला सुनावले.
कदाचित नीतू चंद्राचे शब्द सिद्धार्थच्या चांगलेच वर्मी लागले आणि अखेर त्याने या सगळ्याबद्दल माफी मागितली. अलीकडे एका टीव्ही शोवर मी एक वेगळी भाषा बोलण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत माझ्याकडून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.  त्या भाषेचा कुठल्याही प्रकारचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता, असे सिद्धार्थने म्हटले आहे.

येत्या २५ जानेवारीला सिद्धार्थचा ‘अय्यारी’ रिलीज होणार होता. पण ‘पद्मावत’मुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकण्यात आली. आता हा चित्रपट ९ फेबु्रवारीला रिलीज होणार आहे. अर्थात याचदिवशी अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ रिलीज होणार असल्याने ‘अय्यारी’ विरूद्ध ‘पॅडमॅन’ असा सामना बॉक्सआॅफिसवर पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -