Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना जन्मठेप

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना जन्मठेप

मुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोन्ही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन यांना मुंबई सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेप सुनावली असून ही शिक्षा एकत्रच भोगायची आहे.

मीनाक्षी थापा हत्याकांडप्रकरणी अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने आयपीसी कलम ३०२, ३६१ (अ), १२०(बी), २०१ आणि आयटी अॅक्ट अंतर्गत दोषी ठरवलं होतं. न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी अपहरण, खंडणी आणि हत्या या प्रकरणी मीनाक्षीच्या मारेकऱ्यांना तिहेरी जन्मठेप सुनावली आहे.

पैशाच्या हव्यासापोटी अमित आणि प्रीती यांनी हत्या केली होती. सुरुवातीपासूनच या दोघांनी मीनाक्षीची हत्या करण्याचं ठरवलं होतं, त्यामुळे या दोघांना फाशीपेक्षा कमी शिक्षा होऊ नये अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केली होती.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूडमध्ये नाम कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून 26 वर्षीय मीनाक्षी थापा ही नेपाळी तरुणी मुंबईत आली होती. देहरादूनहून मुंबईत येण्याआधी मीनाक्षी डान्स स्कूल आणि स्केटिंग स्कूलमध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करत होती.

मुंबईत आल्यावर तिने फ्रँकफिनमध्येही कोर्स केला होता. आपल्या मेहनतीने तिने ‘सहेर’, ‘४०४’ अशा काही हिंदी सिनेमांत छोटे छोटे रोल्सही मिळवले होते. मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ या सिनेमाच्या सेटवर मीनाक्षीची ओळख अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोन ज्युनिअर आर्टिस्टशी झाली.

आपण एका श्रीमंत घरातून आल्याचं मीनाक्षीने या दोघांना खोटंच सांगितलं. आपण केवळ आवड म्हणून बॉलिवूडमध्ये काम करत असल्याची थाप तिने मारली. मात्र हे खरं मानलेल्या अमित आणि प्रीतीने पैशांच्या हव्यासातून मीनाक्षीचं अपहरण केलं.

अपहरण केल्यानंतर त्यांनी थापा कुटुंबीयांकडून १५ लाखांची मागणी केली. मीनाक्षीच्या आईने कसेबसे 60 हजार रुपये जमा केले. यावरुन त्यांना मीनाक्षीच्या फोलपणाची कल्पना आली.

त्यानंतर त्यांनी अलाहबादमध्ये मीनाक्षीचं डोकं धडापासून वेगळं करत तिची हत्या केली. मीनाक्षीचं धड अलाहबादच्या एका गटारात टाकून तिच्या मुंडक्यासह ही दोघं बसने गोरखपूरला रवाना झाली. पुढे चालत्या बसमधून त्यांनी मीनाक्षीचं मुंडकं रस्त्यात फेकून दिलं. जे आजवर पोलिसांना सापडलेलं नाही.

मीनाक्षीची हत्या करुन अमित आणि प्रीतीने तिचा मोबाईल आणि एटीएम कार्ड आपल्या ताब्यात घेतलं होतं. जेणेकरुन तिच्या अकाऊंटमधील पैसे सहज काढता येतील.

अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन हे दोघंही मूळचे अलाहबादचे. अमितचे वडील हे तिथे एक नामांकित वकील आहेत. अमितचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत. अमितला सुरुवातीपासूनच शानशौकीत राहण्याची आवड होती. तसंच त्याला फिल्मी दुनियेचं विलक्षण आकर्षण होतं. अमित अलाहबादमध्ये एक कोचिंग क्लास चालवायचा. तिथेच त्याची प्रीतीशी ओळख झाली.

प्रीतीचे वडील तिथे एका शाळेत काम करतात. प्रीतीलाही फिल्मी दुनियेचं वेड होत. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. घरच्यांच्या विरोधाला कंटाळून एक दिवस दोघांनी अलाहबाद सोडलं आणि मुंबई गाठली आणि सिनेमात छोटीमोठी कामं करु लागले.

मूळातच उंची राहणीमानाचं आकर्षण असल्याने लवकरच त्यांना पैशांची चणचण भासू लागली. मग झटपट पैसे कमवण्याच्या नादात असतानाच त्यांची मीनाक्षीशी ओळख झाली. मग झटपट श्रीमंतीच्या नादात त्यांनी मीनाक्षीचं आधी पैशांसाठी अपहरण केलं आणि त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments