Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनदिग्दर्शक, अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

दिग्दर्शक, अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

मुंबई:खिलाडी ४२०’, ‘फिर हेराफेरीया चित्रपटांच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर विरासत’, ‘रंगीला’, ‘मनया चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गुजरातमधील भूज येथे १९६३ मध्ये नीरज व्होरा यांचा जन्म झाला. नीरज व्होरा यांना कलेची ‘विरासत’ वडील पंडित विनायक राय व्होरा यांच्याकडून मिळाली. त्यांचे वडील हे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते. नीरज व्होरा यांच्या मातोश्री प्रमिला बेन यांना चित्रपटांची आवड होती. लहानपणी आईसोबत नीरज व्होरा हे देखील चित्रपट पाहायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी गुजराती नाटकांसाठी लेखक म्हणून काम केले. केतन मेहता यांच्या ‘होली’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली आणि विनोदाची अचूक टायमिंग साधून प्रेक्षकांना हसवणारा आणखी एक कलाकार हिंदी सिनेसृष्टीला गवसला. विनोदी भूमिकांसह त्यांनी विरासत, कंपनी या सारख्या सिनेमांमध्येही काम केले. हॅलो ब्रदर, रंगीला, मन, पुकार, बादशहा, सत्या, मस्त, अकेले हम अकेले तूम, दौड या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

नीरज व्होरा यांच्या वडिलांचे २००५ मध्ये निधन झाले. तर २०१४ मध्ये त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते. तर त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. नीरज व्होरा यांच्या पश्चात कोणीही नव्हते. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. गेल्या वर्षी दिल्लीत ह्रदयविकाराचा झटका आल्याने नीरज व्होरा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र याच दरम्यान ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. काही दिवस ते कोमातही होते. मुंबईत ख्यातनाम सिनेनिर्माते फिरोझ नाडियाडवाला यांच्या निवासस्थानी ते होते.  फिरोझ यांनी नीरज यांच्यासाठी घरातील एक खोली आयसीयूसारखीच तयार केली होती. ‘फिर हेराफेरी ३’ हा चित्रपट त्यांनी हाती घेतला होता. मात्र तो चित्रपट पूर्ण करण्याचे नीरज व्होरांचे स्वप्न अर्धवटच राहिले.

पाच दिवसांपूर्वी नीरज व्होरा यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी मल्टी ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments