‘पद्मावती’वादात उद्धव ठाकरे यांची मध्यस्ती ते कमल हासन यांचे ट्वीट!

- Advertisement -

संजय लीला भन्साळींच्या पद्मावतीची रिलीज डेट भलेही लांबणीवर पडली असेल पण या चित्रपटाचा वाद अद्यापही शांत होताना दिसत नाहीये. राजकीय गोटातही या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात पद्मावतीरिलीज होणार नाही, असे जाहिर केले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब सरकारनेही चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. तिकडे राजस्थानातील करणी सेनेसारख्या राजपूत संगटनांनीही या चित्रपटाविरोधात विरोधाचे हत्यार पाजळले आहे. या वादाच्या पाश्वभूमीवर पद्मावतीला विरोध करणा-या राजपूत संघटनांच्या नेत्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी या वादावर संजय लीला भन्साळींशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी या मुद्यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती राजपूत नेत्यांनी उद्धव यांना केली असल्याचे कळते. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात यावे. राजपूत समुदायला यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही तर आम्ही चित्रपट रिलीज होऊ देऊ, अशी या नेत्यांची मागणी आहे.  या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मध्यम मार्ग काढण्याची भूमिका घेतली आहे. राजपूत संघटनांचा आक्षेप असेल ती दृश्ये भन्साळींनी एडिट करायला हवीत. राजपूतांच्या हितांचे नुकसान होणार नाही, असा मार्ग काढण्यावर शिवसेनेने भर दिला आहे. मला दीपिकाचे शिर सुरक्षित हवे आहे – कमल हासन

‘पद्मावती’चा विरोध करणा-यांना फटकारल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. करणी सेनेने दीपिकाचे नाक कापण्याची धमकी दिली आहे. तरएका राजपूत संघटनेने दीपिका व भन्साळींचे शिर कापून आणणाºयास बक्षिस जाहिर केले आहे. या पार्श्वभूमीवर साऊथ सुपरस्टार कमल हासन यांनी ट्वीट केले आहे. ‘मला हवेयं, दीपिकाचे शिर सुरक्षित राहावे. तिचे शरिर आणि तिच्या स्वातंत्र्यांचा सन्मान व्हावा. अनेक समुदायांनी माझ्या चित्रपटांचाही विरोध केला आहे. कुठल्याही चर्चेत अतिरेकी विचार दु:खद आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा इन्कार
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावती’वर नव्याने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सेन्सॉर बोर्डाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. अशास्थितीत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. सध्या हे प्रकरण प्री मॅच्योर आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. वकील एम एल शर्मा यांनी याचिका दाखल करत ‘पद्मावती’तील आक्षेपार्ह दृश्ये गाळण्याची शिवाय निर्माता व दिग्दर्शकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

- Advertisement -