Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजन'पानिपत'वर प्रदर्शनापूर्वीच वादाचे संकट!

‘पानिपत’वर प्रदर्शनापूर्वीच वादाचे संकट!

दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरांच्या ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघा आठवडा राहिला आहे. पण प्रदर्शनाच्या आठवड्याभरापूर्वीच या चित्रपटावर वादाचे संकट ओढवले आहे. पानिपतच्या तिस-या युद्धावर आधारित हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अर्जुन कपूरने पेशवे सदाशिव रावांची भूमिका वठवली आहे, तर कृती सेनन त्यांची पत्नी पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. संजय दत्तने या चित्रपटात अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमधील मस्तानीविषयीच्या संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. त्याला उत्तर न दिल्यास कोर्टात धाव घेण्याचा इशारा बाजीराव पेशव्यांच्या आठव्या पिढीचे वंशज नवाब शादाब अली बहादूर यांनी दिला आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री क्रिती सेननच्या तोंडी असलेल्या संवादावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्या सुनीता गोवारिकर, रोहित शेलाटकर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांना नोटिस पाठवून वादग्रस्त संवाद चित्रपटातून काढण्याची मागणी केली आहे.

या चित्रपटात क्रिती सेननने सदाशिवरावांची पत्नी पार्वतीबाईंची भूमिका साकारली आहे. चित्रपटात “मैने सुना है जब पेशवा अकेले मोहिम पर जाते है तो एक मस्तानी के साथ लौटते है”, हा संवाद आहे. “चित्रपटात हा संवाद अत्यंत चुकीच्या अर्थाने वापरला गेला असून त्याला माझा विरोध आहे. या संवादातून मस्तानी साहिबांसोबतच पेशव्यांचीही चुकीची प्रतिमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मस्तानीबाई या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी होत्या. चित्रपट आणि ट्रेलरमधील हा संवाद वगळण्याविषयीची नोटीस मी निर्माते व दिग्दर्शकांना पाठवली आहे. त्यांनी नोटीसीला प्रतिसाद न दिल्यास मी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेईन”, असं वक्तव्य नवाब शादाब अली बहादूर यांनी केलं. यामुळे सर्व प्रेक्षकांच्या नजरा या चित्रपटाकडे लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments