Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी

ब्रिटनमध्ये ‘पद्मावती’ प्रदर्शित करण्याची परवानगी

भारतात पद्मावतीचित्रपट प्रदर्शित करण्यावरुन वाद सुरु असला, तरी द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनने (बीबीएफसी) पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणा-या करणी सेनेने युकेमधील थिएटर्स जाळण्याची धमकी दिली आहे. पद्मावतीचित्रपट वादाच्या भोव-यात सापडल्यामुळे भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. पण इंग्लंडमध्ये हा चित्रपट येत्या डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

‘बीबीएफसी’ने चित्रपटातील एकाही दृश्याला कात्री न लावता ‘१२ ए’ रेटिंग दिली आहे. या प्रमाणपत्रामध्ये चित्रपटाच्या सारांशात ‘पद्मावती’ हा हिंदी भाषिक चित्रपट असून, राजपूत राणीला मिळवण्यासाठी एक सुलतान त्यांच्या राज्यावर कशाप्रकारे आक्रमण करतो याचे ऐतिहासिक कथानक यात असल्याचे लिहिले आहे. दरम्यान करणी सेनेचे नेता सुखदेव सिंग यांनी युकेमध्ये ज्या चित्रपटगृहांमध्ये पद्मावती दाखवण्यात येईल, ती सर्व चित्रपटगृह जाळण्याची धमकी दिली आहे.

‘मला स्वत:ला तिथे जाऊन निषेध नोंदवायचा होता, पण भारत सरकारने माझा पासपोर्ट जप्त केला आहे. म्हणून मी तिथल्या आमच्या राजपूत समुदायाला निषेध करायला सांगितलं आहे’, अशी माहिती सुखदेव सिंग यांनी दिली आहे. चित्रपटावर बंदी यावी यासाठी आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार असल्याचं ते बोलले आहेत.

दरम्यान व्हायकॉम 18 ने जोपर्यंत आपलं सेन्सॉर बोर्ड परवानगी देत नाही, तोपर्यंत जगभरात चित्रपट प्रदर्शित करण्याची कोणतीच योजना नसल्याचं सांगितलं आहे. पद्मावती चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा तसेच राजपूत समाजाची चुकीची बाजू दाखवल्याचा आरोप  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर करण्यात येत आहे.

करणी सेनेची देशभरात या चित्रपटाविरोधात आंदोलन सुरु आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पद्मावतीच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणा-या अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना धमक्या दिल्या जात आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पद्मावती चित्रपटात दीपिकाने मुख्य भूमिका निभावली असून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments