प्रार्थना बेहरेचा नवा टॅटू!

- Advertisement -

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे रेशीमगाठीत अडकली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचे शुभमंगल नुकतेच गोव्यात पार पडले. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. प्रार्थना आणि अभिषेकने त्यांच्या लग्नानंतर लगेचच त्यांच्या हातावर एक टॅटू काढला आहे. हा टॅटू सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा टॅटू त्या दोघांनी त्यांच्या बोटावर काढला असून हा टॅटू म्हणजे त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख हातावर गोंदवून घेतली आहे.

प्रार्थनानेच या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि माझा ड्रीम टॅटू असे त्याच्या सोबत लिहिले आहे. या तिच्या फोटोला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रार्थनाच्या लग्नसोहळ्याला प्रार्थनाचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. वैभव तत्त्ववादी, प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णीसह प्रार्थनाच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. प्रार्थनाच्या लग्नाचे हेच फोटो अभिनेत्री प्रिया मराठे हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

- Advertisement -

अभिषेक आणि प्रार्थना यांचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. एका मॅरेज ब्युरोमधून या दोघांचे लग्न जुळले. मात्र प्रार्थना आणि अभिषेकमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. ‘डब्बा एैस पैस’, ‘सॉल्ट आणि प्रेम’ यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. प्रार्थनाने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेद्वारे छोटा पडदा गाजवला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मने जिंकली. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. यामुळं तिच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. लग्नानंतर सिनेसृष्टीत काम सुरू ठेवणार असल्याचे प्रार्थना बेहरे हिने सांगितले. आगामी काळात हिंदी सिनेमांकडेही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे तिने ठरवले आहे.

- Advertisement -