Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeदेशश्रीदेवी यांचे पार्थिव दुपारपर्यंत मुंबईत होणार दाखल

श्रीदेवी यांचे पार्थिव दुपारपर्यंत मुंबईत होणार दाखल

मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. आपल्या कुटुंबासह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असता, शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या.

श्रीदेवी यांचे पार्थिव दुपारी १२ ते २ दरम्यान मुंबईत त्यांच्या घरी येणार आहे. सकाळपासूनच श्रीदेवी यांच्या घराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सिने तारकांनी श्रीदेवींना ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

‘वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्या अर्धशतकी कारकीर्दीत हिंदीसह विविध भाषांमधील चित्रपटांतून अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका तितक्याच समर्थपणे साकारल्या होत्या. विशेषत: सदमा, चांदणी, लम्हें यासारख्या चित्रपटांपासून ते अलीकडच्या इंग्लिश विंग्लिशपर्यंतच्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका निश्चितच दीर्घकाळ स्मरणात राहतील. अभिनय, सौंदर्य आणि कलानिपुणता यांचा अनोखा संगम असलेल्या श्रीदेवी यांनी रुपेरी पडद्याला खऱ्या अर्थाने  ग्लॅमर प्राप्त करून दिले होते.  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी दुबईत आज त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.   प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस.

श्रीदेवी यांचा प्रवास
श्रीदेवींचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण त्या या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हत्या. पण, १९८३ मध्ये ‘हिम्मतवाला’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या.  १९९६ मध्ये  निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर २०१२ साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये  पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट….
जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.

यांनी व्यक्त केलं दुख
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड, राजकरण आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, रजनीकांत, कमल हसन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अष्टपैलू अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविं
अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. मुंद्रम पीरई, लम्हे, इंग्लिश विंग्लिश सारख्या सिनेमांमधील त्यांचा अभिनय सगळ्या नव्या अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी राहील.
माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवींच्या अकाली निधनानं अतीव दुःख झालं. चित्रपटसृष्टीतल्या त्या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या, त्यांची अनेक पात्र अजरामर झाली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments