सुबोध भावेने अशी केली सोनालीची मदत

- Advertisement -

राहुल आणि अंजली या रोमँटिक कपलची लग्नानंतरची स्टोरी सांगणारा ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा नवरा-बायकोंमध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या कुरबुरीवर भाष्य करतो. प्रेमाचा गुलमोहोर लग्नानंतर कसा गळून पडतो, याचे वर्णन या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना सोनाली सांगते, हा सिनेमा अर्ध्या अधिक प्रवासावरच बेतलेला आहे. सुबोधबरोबर पहिल्यांदाच मी काम करत असून त्याच्यासोबत मुंबई टू गोवा असा केलेला ‘तुला कळणार नाही’ मधला प्रवास खूप अविस्मरणीय आहे. या सिनेमाचे चित्रीकरण चालू गाडीमध्येच जास्त झाले आहे. ज्यात मी आणि सुबोध असेच होतो. आमच्या मागे दिग्दर्शकाची गाडी असायची. त्यामुळे फोनद्वारे संवाद आणि इतर गोष्टींचे मार्गदर्शन आम्हा दोघांना त्यांच्याकडून दिले जायचे. पण ते नेहमी शक्य होत नव्हते. त्यामुळे कोणत्यावेळी काय बोलायला हवे आणि आपली काय रिअॅक्शन असायला हवी हे मी आणि सुबोध स्वतःच ठरवायचो. विशेष म्हणजे सुबोध स्वतः उत्कृष्ट दिग्दर्शक असल्यामुळे त्याने मला त्यासाठी खूप मदत केली. खरं तर लाईव्ह बोलताना एकमेकांचे बाँडिंग खूप महत्वाचे असते. आपण नेमके काय बोलतोय आणि ते समोरच्याला आवडेल का, इथून सुरुवात असते. मात्र सुबोधने अगदी चातुर्याने ते सारे हाताळून घेतले आणि आमच्या या प्रवासातील गप्पांचे चित्रीकरण सिनेमात झाले.

नवरा-बायकोच्या नात्यातील जीवनप्रवास प्रत्येक विवाहित जोडपे आपल्या उभ्या आयुष्यात करत असतात. प्रेम, अबोला, वादविवाद, हेवेदावे आणि जबाबदारी अशा अनेक पैलूंमुळे चकाकणाऱ्या या नात्याची दुसऱ्या कोणत्याच नात्यासोबत तुलना करता येत नाही. म्हणूनच तर मोडीत निघालेल्या ओढीची… गोष्ट वेड्या जोडीची’ असे उपशीर्षक असलेला हा सिनेमा प्रत्येकाला आपलीच कहाणी असल्यासारखी वाटेल. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेल्या या सिनेमाला स्वप्निल जोशी, कार्तिक निशानदार, अर्जुन बरन तसेच श्रेया योगेश कदम या निर्मात्यांची मोठी नांदी लाभली आहे. शिवाय  नीरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांनी सहनिर्मितीची धुरा संभाळली असून स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून साकार झालेला हा सिनेमा प्रत्येक नवरा बायकोची बायोपिक मांडण्यास सज्ज झालेला आहे.

- Advertisement -