न्यूड, सेक्सी दुर्गाला इफ्फीतून वगळल्याने सुजॉय घोष यांचा राजीनामा

- Advertisement -

महत्वाचे…
१. मराठी चित्रपट न्यू़ड, मल्याळी चित्रपट सेक्सी दुर्गा ला ४८ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आले. २. ज्युरी मेंबर्सच्या अध्यक्षपदाचा फिल्ममेकर सुजॉय घोष यांचा राजीनामा ३. २० नोव्हेंबरपासून गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल साजरा होणार


मुंबई : मराठी चित्रपट न्यू़ड आणि मल्याळी चित्रपट सेक्सी दुर्गा ४८ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आल्यामुळे ज्युरी मेंबर्सच्या अध्यक्षपदाचा फिल्ममेकर सुजॉय घोष यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, सुजॉय रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.

येत्या २० नोव्हेंबरपासून गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल साजरा होणार आहे. सुजॉय घोष यांच्या अध्यक्षतेखालील तेरा ज्युरी मेंबर्सनी एकूण २४ चित्रपटांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनारोम विभागात न्यू़ड आणि सेक्सी दुर्गा या चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार होते. पण, अंतिम टप्प्यात माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या दोन्ही चित्रपटांना वगळण्यात आले. चित्रपटांच्या नावावर आक्षेप घेत माहिती व प्रसारण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधून वगळल्याची माहिती मिळते.

दरम्यान, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या या निर्णयाबद्दल न्यूड चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव आणि सेक्सी दुर्गाचे दिग्दर्शक सनलकुमार ससीधरन यांच्यासह अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवत ज्युरी मेंबर्सचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुजॉय घोष यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिग्दर्शक रवि जाधव यांचा न्यूड हा चित्रपट न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका तरूण स्त्रीच्या जीवनावर आधारीत आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधील स्क्रीनिंगसाठी निवड झाल्याचे वाटले होते. पण, सकाळी वृत्तपत्रात बातमी बघितल्यावर चित्रपटाला वगळल्याचे समजले आणि केंद्र सरकारच्या निर्णयामुळे माझी निराशा झाली, असे रवि जाधव यांनी म्हटले होते. ज्युरी जो निर्णय घेतो तो अंतिम असतो, असे माझे व्यक्तिगत मत आहे. पण ज्युरी मेंबरला कल्पना न देता चित्रपटाचे नाव वगळणे, कुणालाही रूचणार नाही. निर्णय घेताना ज्युरीला कल्पना द्यायला हवी होती, असे रवि जाधव यांनी म्हटले होते. याचबरोबर सेक्सी दुर्गा या चित्रपटातून समाजामधील गडद वास्तव आकर्षकपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक सनलकुमार ससिधरन यांनी सांगितले होते.

- Advertisement -
- Advertisement -