Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनसुरांचा बादशाह मोहम्मद रफी यांची आज ९३ वी जयंती!

सुरांचा बादशाह मोहम्मद रफी यांची आज ९३ वी जयंती!

सुरांचा बादशाह  मोहम्मद रफी यांची आज ९३ वी जयंती. २४ डिसेंबर १९२४ रोजी रफी यांचा जन्म झाला. भारतातील जवळपास सर्वच भाषांमध्ये तब्बल २४ हजारांवर गाणी गायलेल्या या गायकाला गाण्याची प्रेरणा एका फकीराकडून मिळाली होती, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. आजही रफी यांच्या सुरांनी घातलेली मोहिनी ओसरलेली नाही.  सात वर्षांचे असताना रफी त्यांच्या मोठ्या भावाच्या नाव्ह्याच्या दुकानात बसत. याच वाटेने जाणा एका फकीराच्या आवाजाची रफी हुबेहुब नक्कल करत. एकदिवस भावाने त्यांना ही नक्कल करताना पाहिले आणि चिमुकल्या रफीची गाण्याची आवड ओळखून त्यांना गाण्यास पाठविले. यानंतर वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी रफी यांना गायनाची संधी मिळाली. अर्थात ती पण योगायोगाने. कुंदनलाल सेहगल यांच्या गाण्यांची मैफल सजली असताना अचानक वीज गेली आणि सेहगल यांनी गाण्यास नकार दिला.  त्यामुळे ऐनवेळी रफी यांना गाण्यासाठी उभे केले गेले.  श्रोत्यांमध्ये संगीतकार श्याम सुंदर होते. त्यांनी रफींचे गाणे ऐकले आणि त्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. याच श्याम सुंदर यांच्या दिग्दर्शनाखाली रफी यांनी आपले पहिले  ‘सोनिये नी हिरीये नी’ हे पंजाबी गाणे गायले. यानंतर १९४४ मध्ये नौशाद यांनी संगतीबद्ध केलेले ‘हिंदोस्तान के हम है, हिंदोस्तान हमारा’ हे हिंदी गाणे गात त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.त्यादिवशी रफी यांनी आपल्या गोड गळ्याने रसिकांच्या मनावर जी जादू केली ती आजतागायत आपण अनुभवत आहोत. नंतर असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू त्यांनी दाखवून दिली. त्यांच्या वाटयाला आलेल्या काश्मीर की कली’ने इतिहास घडविला.  

केवळ गायक म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणूनही रफी महान होते. म्हणूनच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संघर्षकाळात त्यांच्याकडून १ रूपयाच्या मानधनावर रफी त्यांच्यासाठी गायले होते. या महान कलाकाराने कधीच संपत्तीचा लोभ केला नाही. एकदा रेकॉर्डिंग झाल्यावर तब्बल दोन तास रफी स्टुडिओबाहेर ताटकळत होते. अचानक नौशाद त्याठिकाणी आले. त्यांनी रफींना ताटकळण्यामागचे कारण विचारले. यावेळी रफी यांनी जे काही सांगितले ते ऐकून नौशादही गहिवले. ट्रेनचे तिकिट काढायला पैसे नाहीत म्हणून थांबलोय, असे रफी म्हणाले. यावर मागून घ्यायचे ना, असे नौशाद त्यांना म्हणाले. यावर रफींनी काय उत्तर द्यावे? रेकॉर्डिंग अजून पूर्ण झालेले नाही. उद्या पुन्हा यायचेचं आहे. तेव्हा आजची रात्र स्टुडिओ बाहेर काढून उद्या रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावरच पैसे घेईल, असे ते म्हणाले. रफी यांचे ते शब्द ऐकले अन नौशाद यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
एकदा एका सिग्नलवर गाडी थांबली अन् एका भिकाऱ्याने रफी यांच्यासोबत हात पुढे केला. रफी यांनी  खिशात हात घालून त्यांच्याकडे होते  नव्हते तेवढे सगळे पैसे काढून त्या भिकाऱ्याला दिले.  देवाने, मला देताना काहीच कमी दिले नाही, तर मी त्याच्याच एका अंशाला देताना का बरे असा विचार करू? असे रफी त्यावेळी म्हणाले होते.
आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या महान अवलियाने ३१ जुलै १९८० रोजी  जगाचा निरोप घेतला. त्यांचे निधन झाले त्यादिवशी धो धो पाऊस कोसळत होता. जणू आभाळालाही अश्रू अनावर झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments