Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन

Arun Kakade passed away
मुंबई : ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे उर्फ काकडे काकांचे आज दुपारी मुंबईतील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. काकडे काका ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते. अरुण काकडे यांच्या निधनामुळे सुमारे सात दशके प्रायोगिक रंगभूमीची अव्याहत सेवा करणारा मराठी नाट्य चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे.

‘आविष्कार’ नाट्यसंस्था ज्याच्या खांद्यावर उभी राहिली असा मजबूत खांब म्हणून अरुण काकडे उर्फ काकडे काका परिचित होते. गेली ६७ वर्षे त्यांनी प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं आपलं नातं टिकवून ठेवलं आणि उतारवयातही त्यांनी तरुणांना लाजवील अशा उत्साहाने नवीन नाटकं सादर केली. त्यांच्या या एकूण योगदानाचा गौरव भारतीय संगीत नाटक अकादमीने त्यांना गौरव पुरस्कार देऊन केला होता.

काकडे काकांनी पुण्यातून आपल्या करिअरला सुरुवात केली, पण लवकरच ते मुंबईत आले. विजया मेहता, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर, माधव वाटवे या तेव्हाच्या तरुण रंगकर्मींनी ‘रंगायन’ ही संस्था सुरू केली होती. या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाटांची निर्मिती होत असे. या संस्थेशी अरुण काकडे जोडले गेले. ‘रंगायन’ मध्ये वाद होऊन संस्था फुटली आणि अरविंद देशपांडे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांनी १९७१ मध्ये ‘आविष्कार’ ही नवी नाट्यसंस्था स्थापन केली.

त्यावेळी काकडे या मंडळींच्या खांद्याला खादा लावून उभे राहिले. या संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून काकडे काका म्हणजे ‘आविष्कार’ हे समीकरणच बनून गेलं, जे अखेरपर्यंत कायम राहिलं. ‘आविष्कार’ ने छबिलदास चळवळ उभी केली. या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले. काकडे काका या चळवळीचे शिलेदार होते. प्रत्येक नवा प्रयोग ‘आविष्कार’ने करावा हा त्यांचा ध्यास असायचा. स्वतः पडद्यामागे राहून ते त्यासाठी अविरत झटत असायचे. त्यांना प्रसिद्धीची हाव नव्हती की रंगमंचावर चमकण्याचा मोह होता. त्यांनी कायमच निर्मिती सूत्रधार या भूमिकेत राहणं पसंत केलं. त्यासाठी त्यांनी आपल्यातील अभिनेतेपणालाही वेळोवेळी मुरड घातली.

काकडे काकांच्या वयाची पंच्याहत्तरी ‘आविष्कार’ ने मोठ्या थाटात साजरी केली होती. त्यावर्षी काकडे काकांनी १२ महिन्यांत १२ नवीन नाटकं ‘आविष्कार’ तर्फे रंगमंचावर आणली होती. आपल्या सुमारे सात दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी रंगकर्मींच्या तीन पिढ्या पाहिल्या आणि घडवल्याही. काकडे काकांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments