Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमंत्रालयातून अशोक चव्हाणांचा पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या ‘त्या’ पित्याला!

मंत्रालयातून अशोक चव्हाणांचा पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या ‘त्या’ पित्याला!

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला आणि पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानून टिकटॉकवर व्हीडीओ करणाऱ्या पित्याला लावला.

चव्हाण यांनी कालच त्यांच्या व्हॉट्सअपवर आलेला टिकटॉकचा हा व्हीडीओ ट्वीट केला होता. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी नवीन वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाची पूजा करताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून लक्ष्मीची पावले म्हणून त्यांची छाप नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती.

लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा हा व्हीडीओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्वीटर आणि फेसबुकवर हा व्हीडीओ शेअर करून एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, मोबाईलवर हा व्हीडीओ नजरेस पडला. मन भरून आलं. खूप कौतूक वाटलं त्या पित्याचं जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय. दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल!

अशोक चव्हाण यांची ट्वीटर व फेसबुकवरील ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. हा टिकटॉक व्हीडीओ तयार करणारे नागेश पाटील यांच्यापर्यंतही ती पोहोचली. रात्री उशिरा त्यांनी ट्वीटरवरून चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. चव्हाणांनी सकाळी तो ट्वीट पाहिला. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रालयातील कार्यालयात बसण्याचा आज त्यांचा पहिलाच दिवस होता. कार्यालयात पूजा करून स्थानापन्न झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिला फोन नागेश पाटील यांनाच लावला.

नागेश पाटील हे वाहनचालक असून, ते पुण्याला खासगी नोकरी करतात. चव्हाण यांच्या ट्वीटला रात्री उशिरा उत्तर दिल्यानंतर सकाळीच त्यांचा फोन आल्याने ते देखील भारावून गेले होते. नागेश पाटील यांच्याशी केलेल्या संभाषणात चव्हाण यांनी या व्हीडीओ मागील भावनेचे कौतूक केले. त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली आणि कोल्हापूर किंवा पुण्याला आल्यावर नक्की भेटू, असे आश्वासनही दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments