Friday, March 29, 2024
Homeविदर्भनागपूरभाजपचा पाच जिपमध्ये पाणीपत; जागांमध्ये दुपटीने वाढ

भाजपचा पाच जिपमध्ये पाणीपत; जागांमध्ये दुपटीने वाढ

महाविकास आघाडीच्या ताब्यात ४ तर १ जिपमध्ये त्रिशंकू

Congress NCP Shivsena BJPमुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज बुधवार (८ जानेवारी ) जाहीर झाले. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी झाली. सहापैकी पाच जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव झाला. मात्र, जागांमध्ये दुपटीने वाढ झाली. चार जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला.

भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असलेल्या नागपूरची जिल्हा परिषद काँग्रेसने खेचून आणली. तर धुळे जिल्हा परिषदेत भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आले. पालघर शिवसेना तर अकोलामध्ये भारिप बहुजन महासंघ (वंचित) सर्वात मोठा पक्ष म्हणून अस्तित्वात आला. नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने जिल्हा परिषदांमध्येही भाजपची कोंडी केली आहे. विशेष म्हणजे भाजपचा गड असलेल्या नागपुरात विरोधकांनी एकत्र येऊन भाजपला धूळ चारली आहे. धुळे जिल्हा परिषदेत मात्र भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि भाजपला समसमान २३ जागा मिळाल्या. पण काँग्रेससह महाविकास आघाडीचा विजय झाला. पालघरमध्येही महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा आहेत. वाशिम आणि अकोल्यात वंचित आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. मात्र वाशिमध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. सहाही जिल्हा परिषदांमधील एकूण जागांचा एकत्रित विचार केल्यास भाजपला सर्वाधिक जागा आहेत. मात्र महाराष्ट्र विकास आघाडीमुळे भाजपला सत्ता राखता आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या एकूण ३३२ जागांपैकी भाजपला १०३ जागा मिळाल्या.

या सहा जिल्हा परिषदांमध्ये गेल्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये केवळ ५३ सदस्य भाजपाचे होते. ती संख्या आता १०३ वर पोहोचली आहे. ही वाढ जवळपास दुप्पट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या यापूर्वी या ६ जिल्हा परिषदेत १४८ जागा होत्या, त्या आता कमी होत ११८ वर आल्या आहेत. मात्र चार जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडी एकत्र सत्ता स्थापन करणार हे निश्चित आहे.

नंदूरबार आणि धुळ्याचे निकाल तर विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. धुळ्यात भाजपाने प्रथमच स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेत भाजपाचा केवळ एक सदस्य होता, आता भाजपाने २३ जागांवर झेप घेतली आहे. मात्र सहापैकी चार जिपमध्ये महाविकास आघाडी सत्तास्थापन करणार हे निश्चित आहे. तर एका ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

सहा जिल्हा परिषदांमधील एकूण जागा ३३२

पक्षनिहाय जिंकलेल्या जागा –

भाजप – १०३

काँग्रेस – ७४

राष्ट्रवादी – ४३

शिवसेना -४८

इतर – ६१

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments