Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याती जळालेली प्राध्यापिका कृत्रिम श्र्वासावर, मृत्यूशी झुंज सुरुच

ती जळालेली प्राध्यापिका कृत्रिम श्र्वासावर, मृत्यूशी झुंज सुरुच

Wardha Teacher,Wardha, Teacher,Vicky Nagaraleवर्धा : एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय प्राध्यापक तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळले होते. ही घटना वर्धा जिल्ह्य़ातील हिंगणघाट येथे सोमवारी घडली होती. त्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु असून श्र्वासनलिका जळाल्याने तिला श्र्वास घेणे कठीण जात आहे. मुंबईतील डॉक्टरांची टीम उपचारासाठी नागपूरमध्ये दाखल झाली आहे.

हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून पेटवलेल्या पीडित प्राध्यापिकेची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु असून पुढील ४२ तास महत्त्वाचे असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. (विकेश ऊर्फ विक्की ज्ञानेश्वर नगराळे) रा. दरोडा,ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा या विवाहित तरुणाने भररस्त्यात प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली असून, चेहरा पूर्ण जळाल्याने तिला वाचा आणि डोळे कायमचे गमवावे लागण्याची भीती आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त विद्यार्थी आणि नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.

पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयासाठी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेली तरुणी सोमवारी सकाळी आपल्या घरून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर आधीच दबा धरून बसला होता. तिला पाहताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर काहींनी तिच्या अंगावर पाणी ओतून आगीवर नियंत्रण आणले. मात्र, तोपर्यंत ती ४० टक्के भाजली. तिला आधी हिंगणघाट रुग्णालयात आणि नंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिचा चेहरा पूर्णपणे जळाला असून, ती वाचाही गमावण्याची भीती आहे. तसेच डोळे गमावण्याचीही शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पीडित तरुणी आणि आरोपी रोज बसने प्रवास करीत होते. मात्र, सोमवारी आरोपी दुचाकीने आला. त्याने कट रचून हे क्रूर कृत्य  केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

आरोपीचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते. सोमवारच्या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त होऊ लागताच पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी हिंगणघाटला भेट दिली. यावेळी पोलीस ठाण्यापुढे शेकडोंचा जमाव ठिय्या देऊन बसला होता. अखेर घटनेनंतर सहा तासांनी आरोपी नगराळे यास टाकळघाट येथून अटक करण्यात आली. दरम्यान, सायंकाळी हिंगणघाट शहरातून संतप्त नागरिकांचा मोर्चा निघाला. मुलींनी स्वतंत्र मोर्चा काढला. महिला काँग्रेसच्या चारुलता टोकस आणि हेमलता मेघे यांनी जलदगती न्यायालयाद्वारे खटला चालविण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments