Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2021:खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले संतापले;म्हणाले…

- Advertisement -
chhatrapati-sambhaji-raje-bhosale-disappointed-on-lighting-at-raigad-fort
chhatrapati-sambhaji-raje-bhosale-disappointed-on-lighting-at-raigad-fort

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यासह रायगडावरही उत्साहाचं वातावरण आहे. शिवजयंतीनिमित्त रायगडावर भारतीय पुरातत्व विभागाने रोषणाई केली आहे. मात्र, रायगडावर करण्यात आलेली रोषणाई पाहून छत्रपती संभाजीराजे भोसले हे चांगलेच भडकले. ” भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल,” असा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

करोनामुळे शिवजयंती सोहळा साजरा करण्यावर राज्य सरकारकडून काही सूचना आणि नियमावली जारी करण्यात आलेल्या असल्या, तरी सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरही रोषणाईचा झगमगाट करण्यात आला आहे. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या रोषणाईबद्दल छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे.

- Advertisement -

एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून. या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो,” अशा शब्दात संभाजीराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह असला, तरी राज्यात करोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं सरकारनं प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.

- Advertisement -