Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर पाच दिवसांचा आठवडा,शासन निर्णय जारी!

अखेर पाच दिवसांचा आठवडा,शासन निर्णय जारी!

Uddhav Thackeray will take oath as CM

मुंबई : राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी येत्या २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. शनिवार आणि रविवारी सरकारी कार्यालये बंद राहतील. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने १२ फेब्रुवारीला मंत्रिमंडळ बैठकीत पाच दिवसांच्या आठवड्याबाबत निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी २९ तारखेपासून होणार आहे. केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी आणि रविवारी सुट्टी राहील. ४५ मिनिटाचे वाढीव काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी पासून होईल.

मुंबईसह सर्व कार्यालयांसाठी अशी आहे कामाची वेळ…

सध्या बृहन्मुंबईतील कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायं. ५.३० अशी आहे. ती आता ९.४५ ते सायं. ६.१५ अशी होईल. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी ९.३० ते सायं.६.३० अशी राहील. बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी देखील ही वेळ ९. ४५ ते सायं.७.१५ अशी राहील.

बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ५.४५अशी कामाची वेळ सध्या आहे.  मात्र आता पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व कार्यालयाना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी १ ते २ या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळ देखील अंतर्भूत आहे.

या कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा नाही…

ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयाना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही.

अत्यावश्यक सेवा : शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार.

शैक्षणिक संस्था : शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने.

जलसंपदा विभाग : दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील कर्मशाळा.  नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रिय कामावरील व प्रकल्पांवरील नियमित आस्थापना, स्थायी व अस्थायी आस्थापना व रोजंदारीवरील क्षेत्रिय कामगार व कर्मचारी.

सार्वजनिक आरोग्य विभाग : व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट नागपूर.

महसूल व वन विभाग : बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटके, अलापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये, पुणे.

सामान्य प्रशासन विभाग : शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग.

कृषी विभाग : दुग्धशाळा विकास विभागांतर्गत दुग्ध योजना.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग : शासकीय मुद्रणालये.

कौशल्य व उद्योजकता विकास : सर्व आयटीआय.

केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे.  सध्या दुसरा आणि चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी असते. पाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे.  तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबाना वेळ देणे शक्य होवून त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल.

प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार

सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस २८८ होतात.  भोजनाचा ३० मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन ७ तास १५ मिनिटे प्रतिदिन कामाचे तास होतात.  यामुळे एका महिन्यातील कामाचे तास १७४ तर एका वर्षातील कामाचे तास २०८८ इतके होतात.

पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस २६४ होतील.  मात्र, कामाचे ८ तास होतील.  परिणामत: एका महिन्यातील कामाचे तास १७६ तर वर्षातील कामाचे तास २११२ इतके होतील.  म्हणजेच प्रतिदिन ४५ मिनिटे, प्रतिमहिना २ तास आणि प्रतिवर्ष २४ तास इतके कामाचे तास वाढतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments