Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज १५ हजार ५१ नवीन कोरोनाबाधित, ४८ रूग्णांचा मृत्यू

राज्यात आज १५ हजार ५१ नवीन कोरोनाबाधित, ४८ रूग्णांचा मृत्यू

मुंबई: राज्यात कोरोना हाहाकार सुरुच आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. तर, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील तसा इशारा दिला आहे. दरम्यान, आज(सोमवार) दिवसभरात राज्यात १५ हजार ५१ करोनाबाधित वाढले असून, ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मृत्यूदर २.२७ टक्के एवढा झाला आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ९०९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज रोजी राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज १०,६७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २१,४४,७४३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.०७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यापाठोपाठ आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील निर्बंध कठोर करण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे.

“वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचं पालन करून सहकार्य करावं”, असं आवाहन राजेश टोपेंनी राज्यातल्या जनतेला केलं आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या अंशत: लॉकडाऊनची परिस्थिती असताना संपूर्ण राज्यासाठीच तशा प्रकारचे निर्बंध घातले जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments