राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार संपूर्ण जगाला प्रेरणादायी!: बाळासाहेब थोरात

काँग्रेसच्यावतीने हुतात्मा दिन व एकता संमेलनात अभिवादन

- Advertisement -

Uddhav Thackeray meets on establishment of power : Balasaheb Thoratसंगमनेर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा ही शिकवण संपूर्ण जगाच्या शांततेसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त एकता संमेलन व हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, विश्‍वासराव मुर्तडक, इंद्रजितभाऊ थोरात, गुलाबराव ढोले, प्रा. बाबा खरात, अ‍ॅड. त्र्यंबक गडाख, सुरेश थोरात, ज्ञानेश्‍वर राक्षे, नवनाथ अरगडे, आर. एम. कातोरे, तनवीर पठाण, के. के. थोरात, प्रा. ज्ञानेश्‍वर गायकवाड, अनिल सातपुते, नितीन अभंग, सुभाष सांगळे, रोहिदास सानप आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी नामदार थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला भारताची ओळख करुन दिली. सत्य व अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याची लोकचळवळ उभारून देशाला स्वातंत्र्य मिळवून  दिले. भारतात चंपारण्य येथील शेतकर्‍यांसाठी उभारलेल्या सत्याग्रहाचे आंदोलन, असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, 1942 ची चले जाव चळवळ अशा विविध आंदोलनांमध्ये देशाचे नेतृत्व केले. त्यागाची व बलिदानाची शिकवण देणार्‍या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आज जगाला गरज असून त्यांचे जीवनकार्य भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी ठरले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले की, महात्मा गांधी यांचे जीवनकार्य हे पूर्ण संघर्षातून उभे राहिलेले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोरगरीब सर्वसामान्यांना सामावून घेतांना महात्मा गांधींनी संपूर्ण देश जागा केला. या आंदोलनातून ब्रिटिशांना धडकी भरवली. ब्रिटिशांच्या अत्याचाराला त्यांनी अहिंसेतून उत्तर दिले. असे सत्य व अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान आजही प्रत्येकासाठी अनुकरणीय असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर नव्या पिढीने गांधीजींच्या जीवन चरित्राचा अभ्यास करावा असेही ते म्हणाले.

काँग्रेस शहराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तडक म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी ऐतिहासिक परंपरा असून संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्ते गोरगरिब जनतेच्या विकासासाठी काम करण्यास सदैव कटिबध्द आहे. तर प्रा. बाबा खरात यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विविध भजने गायली.

यावेळी दत्तात्रय थोरात, शिवाजी गोसावी, तात्याराम कुटे, किशोर टोकसे, दत्तू कोकणे, गौरव डोंगरे, भास्कर आरोटे, रमेश गफले, तान्हाजी शिरतार यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -