सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक

- Advertisement -
mumbai-police-cop-sachin-vaze-arrested-by-nia

mumbai-police-cop-sachin-vaze-arrested-by-nia

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.

सचिन वाझे शनिवारी सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला होता. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली होती त्यामधून घातपाताची धमकी दिल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं होतं.

- Advertisement -