Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर कालवश

ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर कालवश

Nava Kaal newspaper editor nilkanth khadilkar passed away
मुंबई : ‘नवाकाळ’ दैनिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री नीलकंठ खाडिलकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. खाडिलकरांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

अंतिम दर्शनासाठी खाडिलकरांचं पार्थिव दुपारी 12 ते 2 दरम्यान नवाकाळ दैनिकाच्या गिरगावातील कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. विविध राजकीय नेत्यांनीही खाडिलकरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

खाडिलकर यांच्या मार्मिक आणि सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच त्यांना ‘अग्रलेखांचा बादशाह’ अशी बिरुदावली मिळाली.

नीळकंठ खाडिलकर यांच्या बद्दल थोडक्यात…

अग्रलेखांचा बादशाह अशी खाडिलकर यांची ओळख होती. तसेच, दै. नवाकाळ या वृत्तपत्राचे ते अनेक वर्षे संपादकही होते. ६ एप्रिल १९३४ रोजी खाडिलकर यांचा जन्म झाला. अर्थशास्त्र विषयासह त्यांनी बी.ए.ऑनर्सचे शिक्षण पूर्ण केले.

अग्रलेखांव्यतिरिक्त एक उत्तम मुलाखतकार म्हणूनही त्यांची ओळख होती. गोळवलकर गुरूजी, सत्यसाईबाबा यांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती फार गाजल्या होत्या. तसेच, ते ज्येष्ठ नाटककार आणि केसरीचे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे नातू होते.

धारदार लेखणीच्या माध्यमातून नोकरशाही- राज्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवला – शरद पवार

ज्येष्ठ पत्रकार, प्रख्यात मुलाखतकार आणि दै. नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुखःद वृत्त समजले. अग्रलेखांचे बादशाह निळुभाऊंनी धारदार लेखणीच्या माध्यमातून नोकरशाही- राज्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवला; ऱ्हासाधीन व्यवस्थेवर मार्मिक ओरखडे ओढले.

लेखणीतून अनेक प्रश्नांना वाचा फोडली – देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या लेखणीतून अनेक प्रश्नांना वाचा फोडली. वैचारिक मंथनातून समाजमन घडविण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत होती. आज ते आपल्यात नाहीत.
त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीयांच्या दुःखात मी सहभागी आहे..

अग्रलेखांचे बादशहा काळाच्या पडद्याआड गेले – बाळासाहेब थोरात

ज्येष्ठ पत्रकार, दै. नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर यांच्या निधनामुळे सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करणारे अग्रलेखांचे बादशहा काळाच्या पडद्याआड गेले आहेत. नीलकंठ खाडिलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments