हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी आरोप फेटाळले

- Advertisement -
sachin-waze-clarification-on-devendra-fadnavis-allegations
sachin-waze-clarification-on-devendra-fadnavis-allegations

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांची गाडी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंकडे कशी आली? असा सवाल करतानाच वाझे हे हिरेन यांची गाडी वापरत होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांचा हा आरोप सचिन वाझे यांनी फेटाळून लावला आहे. गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा होत नाही, असं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मनसुख हिरेन प्रकरणावरून सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका केली जात आहे. फडणवीस यांनी हिरेन प्रकरण विधानसभेत लावून धरल्याने वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आजही या प्रकरणावरून फडणवीस यांनी वाझे यांच्यावर आरोप केले होते. त्यावर वाझे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रसारमाध्यमांनी सचिन वाझे यांना फडणवीसांच्या आरोपांबाबत विचारलं असता, गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही, असं वाझे म्हणाले. गाडी माझ्याकडे असणं आणि नसणं यात गुन्हा काय? गाडी माझ्याकडं असणं हा आरोप आहे का? यात आरोप काय? आरोप काय आहेत त्यात ते तर सांगा, असं वाझे म्हणाले. यावेळी त्यांना विमला हिरेन यांनी जबाबात तुमचं नाव घेतलं आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर मी जबाब वाचला नाही. त्यांनी काही आरोप केला जबाब वाचतो आणि त्यानंतर उत्तर देतो, असं ते म्हणाले.

- Advertisement -

हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी जबाब दिला आहे. त्यात अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ही हिरेन यांची असून ही कार नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत वाझे वापरत होते, असं म्हटलं आहे. वाझे हे हिरेन यांना ओळखत नाहीत तर त्यांच्याकडे ही कार कशी आली? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांचे  आरोप काय?

हा जो मनसुख हिरेन आहे. यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय विठ्ठल गावडे यांच्याठिकाणी आहे. 40 किमीवर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरेन यांची बॉडी सापडली. त्यामुळे हे स्पष्ट आहे, यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत? 201 खाली सचिन वाझेंना अटक का झाली नाही? ३०२ चं सोडून द्या.

मला राजकारण नको. ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी देणंघेणं नाही. कोण वाचवतंय, आणि कशासाठी वाचवतंय. आम्हाला संशय आहे, मनसुख हिरेन यांची हत्या गाडीमध्ये करण्यात आली. गावडेंच्या एरियात करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांची बॉडी खाडीत फेकण्यात आली. यांची चूक कुठे झाली, यांना वाटलं हाय टाईड आहे. बॉडी परत आली नसते, लो टाईड होती, म्हणून परत आली. 302 च होत राहिल. तात्काळ सचिन वाझेंना अटक झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस त्यांनी विधानसभेत केली होती.

- Advertisement -