‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी – डॉन करीम लाला’ भेटीचं विधान राऊतांकडून मागे

- Advertisement -

NCP MLAs locked up in Gurgaon Hotel by bjp: Sanjay Rautमुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीसाठी येत होत्या. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर राऊतांवर जोरदार टीका करण्यात आली. काँग्रेस नेते माजी मंत्री मिलींद देवरा, माजी खासदार संजय निरुपम यांनी ते विधान मागे घ्या असा इशारा राऊतांना दिला होता. त्यानंतर राऊतांनी ते विधान मागे घेत असल्याचं आज गुरुवारी (१६ जानेवारी) जाहीर केलं.

संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल चुकीचा प्रचार केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. राऊत तुम्ही शेरो शायरी करत रहा असा सल्ला ट्वीट करुन दिला होता. तर मिलिंद देवरा यांनीही राऊतांना ते विधान मागे घेण्याबाबत इशारा दिला होता.

मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक भयंकर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या,’ असं वक्तव्य राऊत यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला होता. मात्र, त्यानंतरही वाद थांबला नाही. त्यामुळं अखेर राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे.

- Advertisement -

‘खरंतर काँग्रेसच्या मंडळींनी माझं वक्तव्य मनाला लावून घेण्याची गरज नव्हती. मी आजवर अनेकदा इंदिरा गांधी यांच्या भूमिकांचं समर्थन केलेलं आहे. तरीही माझ्या वक्तव्यानं इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला तडा गेला असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत…

कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी इतर नेते जसे जात होते, तसं इंदिरा गांधीही भेटत होत्या, असं संजय राऊत मुलाखतीत म्हणाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत पुन्हा स्पष्टीकरण दिलं. देशातील अनेक नेते करीम लाला याला भेटत होते. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संघटनेला अनेक नेते भेट देत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते, असं संजय राऊत म्हणाले.

कोण होता करीम लाला…

१९२० मध्ये अब्दुल करीम शेर खान उर्फ करीम लाला अफगाणिस्तानहून आपल्या कुटुंबासह मुंबईला आला. दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात असलेल्या गरीब मुस्लिम वस्तीत त्याचं कुटुंब राहत होतं. मुंबईतील पठाणांच्या एका संघटनेत करीम लाला कार्यकर्ता म्हणून सहभागी झाला. मारवाडी, गुजराती समाजातील सावकार, जमीनदार, व्यापारी यांच्यासाठी एजंट म्हणून अवैध वसुलीचं काम त्याने सुरु केलं.

१९६० ते १९८० च्या दरम्यान मुंबईतील तीन माफिया डॉनपैकी एक होता. दोन दशक तो खतरनाक पठाण गँगचा प्रमुख होता. पठाण गँगचा म्होरक्या झाल्यानंतर तो कुख्यात सुपारी किलर झाला. सत्तरच्या दशकात त्याने हाजी मस्तान आणि वरद राजनसोबत हातमिळवणी केली. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनाही तो आपल्या ‘दावत’चं निमंत्रण द्यायचा. २००२ मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here