Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्या...तरी आणखी तीन वर्ष मंदी कायम राहणार : यशवंत सिन्हा

…तरी आणखी तीन वर्ष मंदी कायम राहणार : यशवंत सिन्हा

yashwant sinha on economic downturn kolhapur
कोल्हापूर : देशातील मंदीचे स्वरूप गंभीर आहे. केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन उचित स्वरूपाची कार्यवाही केली तरी आणखी तीन वर्ष मंदी कमी होणार नाही. असे भाकीत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

यशवंत सिन्हा कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. तरीही चटपटीत भाषा वापरून त्याचे गांभीर्य कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असा उल्लेख करून त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या ‘ओला उबेर’ मुळे मंदिसदृश्य परिस्थिती असल्याच्या विधानाकडे लक्ष वेधले.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार आर्थिक प्रगतीचा वेग दोन टक्क्यांनी घसरला आहे. अमिताभ राजन, अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यासारख्या आर्थिक अभ्यासकांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था निसरडय़ा वाटेवर असल्याची टीका करून भारताच्या विकासदराचा ताजा तपशील पाहता अर्थव्यवस्था नजीकच्या भविष्यात तरी पूर्वपदावर येईल याविषयी शंका व्यक्त केली आहे. नोटाबंदी, जीएसटी सारखे अर्थव्यस्थेला घातक ठरणारे निर्णय घेतल्यानंतर मी ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रात लेख लिहून याचे दूरगामी विपरीत परिणाम होऊ शकतात असे मत मांडले होते. आता अवघा देश त्याची प्रचिती घेत असून छोटे, मध्यम उद्योग, व्यवसाय कोलमडून पडले आहेत”, असे त्यांनी सांगितले.

“मंदीची जाणीव झाल्यावर मदतीची घोषणा केली. कार्पोरेट टॅक्समध्ये २.७५ लाख कोटी रुपयांची सवलत जाहीर असली तरी त्याचा सर्व फायदा हा बड्या उद्योजकांना होणार आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यास त्याची मदत होणार नाही”, असे ते म्हणाले. अर्थशास्त्राचे काही नियम आहेत. ते कोणाची छाती 56 इंच आहे ते तपासात बसत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

माध्यमाकडून त्याची दखल घेतली जात नाही…

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांच्यातील लढाऊ बाणा हरपला आहे. ते काही भूमिका मांडत आहेत पण माध्यमाकडून त्याची दखल घेतली जात नाही”, असे ते म्हणाले.

भाजपा हा मुद्दा भावनिक करून उठवत आहे…

काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्याचा राजकीय फायदा भाजपा हा मुद्दा भावनिक करून उठवत आहे. केंद्र शासनाचे सर्व निर्णय मोदी हेच घेतात. बाकीचे मंत्री कसलाही आवाज काढू शकत नाहीत. प्रशासनातील बडे अधिकारी ‘जो तुमको हो पसंत वो ही बात करेंगे’ असे गाणे गुणगुणण्यात समाधान मानत आहेत. नोकरीवर गदा यावी असे कोणालाच वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments