Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमुख्य बातम्यामृत पक्षी आढळल्यास या टोल फ्री नंबरवर फोन करा!

मृत पक्षी आढळल्यास या टोल फ्री नंबरवर फोन करा!

मुंबईः कोरोना संकटातून सावरत असलेल्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू या आजाराने प्रवेश केला आहे. बर्ड फ्लू दाखल झाल्याचे लक्षात येताच राज्याची यंत्रणा सावध झाली आहे. राज्यातील कोणत्याही गावांत पक्षी जमीनीवर मृतावस्थेत पडलेले आढळले तर स्थानिकांनी टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी यंत्रणेने केले आहे. पोल्ट्री फार्ममध्ये नेहमीपेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले तरी टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या पशू संवर्धन आयुक्तालयाने 18002330418 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. तसेच मुंबई मनपाने 1916 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. (Toll free contat number for bird flu in maharashtra)

बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराची सुरुवात पक्ष्यांमधून होते, पण बर्ड फ्लू बाधीत पक्ष्याचे मांस अथवा अंडी खाल्ल्यास माणसाला हा आजार होण्याचा धोका आहे. भारतात हिमाचल प्रदेश, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, केरळ या नऊ राज्यांमध्ये बर्ड फ्लू या संसर्गजन्य आजारामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा मृत्यू झाला. यात प्रामुख्याने कोंबड्या, कावळे, बदक, बगळे, टिटहरी तसेच काही स्थलांतरित पक्षी यांचा समावेश आहे.

आतापर्यंत देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराचे अस्तित्व आढळले त्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांतील वन क्षेत्र, प्राणीसंग्रहालय या ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लू आजाराची तीव्रता जास्त आहे अशा ठिकाणी पशूपक्ष्यांची खरेदी-विक्री थांबवण्यात आली आहे. तसेच संबंधित भागांतील सरकारी आणि खासगी कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिथे बर्ड फ्लू आजाराची तीव्रता जास्त आहे अशा भागांमध्ये अंडी आणि चिकन यांची विक्री थांबण्यात आली आहे.

विशिष्ट भागांत विशिष्ट पक्ष्यांमध्ये वेगाने बर्ड फ्लू पसरत असल्यास त्या भागातील संबंधित पक्ष्यांना वेगाने ठार मारुन जमीनीत पुरले जाते अथवा त्यांना ठार केल्यानंतर एकत्रित स्वरुपात जाळून नष्ट केले जाते. तसेच बर्ड फ्लू आजाराने मेलेल्या पक्ष्यांनाही जमीनीत पुरले जाते अथवा त्यांना एकत्रित स्वरुपात जाळून नष्ट केले जाते. हेच उपाय सध्या वापरले जात आहेत. पक्ष्यांना जमीनीत खोल खड्डा करुन पुरले तर त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर विशिष्ट रसायने आणि पावडर टाकून आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये याची काळजी घेतली जाते.

बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्याचे मांस अथवा अंडी खाल्ल्यास माणसांची तब्येत बिघडण्याचा धोका असतो. सुदैवाने भारतात बर्ड फ्लू या आजाराचा संसर्ग पक्ष्यांमधून माणसांमध्ये झालेला नाही. चिकन, मांस किंवा अंडी किमान ७० अंश सेल्सिअस तापमानावर व्यवस्थित शिजवून खावे, अशी सूचना सरकारने नागरिकांना केली आहे. यामुळे बर्ड फ्लू होण्याचा धोका कमी करता येऊ शकतो. मात्र बर्ड फ्लू या आजाराचे विषाणू जास्त प्रभावी असल्यास हा उपाय उपयुक्त ठरण्याची शक्यता कमी आहे.

पशूपक्षी हाताळणाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले तरी ते स्वतःचे बर्ड फ्लू आजारापासून बऱ्याचअंशी रक्षण करू शकतात. पशूपक्ष्यांना हाताळताना तोंड आणि नाक व्यवस्थित झाकणारे मास्क वापरणे, हातात डॉक्टर वापरतात तशा हातमोज्यांचा (ग्लोव्हज) वापर करणे हिताचे आहे. पशूपक्ष्यांना हाताळून झाल्यावर आंघोळ केली अथवा हात-पाय तसेच चेहरा साबण आणि शुद्ध पाण्याचा वापर करुन स्वच्छ धुवून कोरडा केला तरी बर्ड फ्लू आजारापासून काही प्रमाणात स्वतःचे रक्षण करणे शक्य आहे. अद्याप बर्ड फ्लू आजारावर मात करण्यासाठी लस तयार झालेली नाही.

भारतात बर्ड फ्लू या संसर्गजन्य आजाराची ही चौथ्यांदा आलेली साथ आहे. याआधी २००६, २०११ आणि २०१५ मध्ये भारतात बर्ड फ्लू आजाराचा प्रार्दूभाव झाला होता. सुदैवाने अद्याप भारतात बर्ड फ्लू या आजारामुळे माणसाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

मृत पक्ष्यांना सामान्यांनी स्पर्श करणे टाळावे, असे आवाहन महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे. अंडी, चिकन तसेच कोणत्याही पक्ष्याचे मांस खाल्ल्यामुळे अथवा पक्षी हाताळल्यानंतर तब्येत बिघडली तर लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलशी संपर्क साधावा. पोल्ट्रीत काम करणाऱ्यांनी तब्येत बिघडल्यास जवळच्या सरकारी हॉस्पिटलशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments