Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या‘मी उध्दव बाळासाहेब ठाकरे’ शपथ घेतो की…

‘मी उध्दव बाळासाहेब ठाकरे’ शपथ घेतो की…

uddhav thackeray will take oath as cm shivaji parkमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. तसंच उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या शपथविधीचा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. यांच्या खांद्यावर सध्या शिवसेनेची धुराही आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आई मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उद्धव ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली. २९ जुलै १९६० रोजी मुंबईत उद्धव ठाकरे यांचा जन्म झाला. उद्धव ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् चे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर..

विद्यार्थी दशेपासून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.

उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.

शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले.

आज उध्दव ठाकरेंना आपल्या राजकीय आयुष्यात यश प्राप्त झालं. महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यामातून उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments