फटाक्यांवरुन ‘राजकीय धूर’ पसरला!

- Advertisement -

दिल्ली पाठोपाठ राज्यातही फटाके विक्री बंदीची चर्चा सुरु असतांना, मंगळवारी राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव निवासी भागात फटाके विक्रिला परवानगी देऊ नका असे आदेश मुंबई उच्चन्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले. यावरुन चांगलेच राजकीय फटाके वाजायला सुरुवात झाली. सरकारचा प्रदषूण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा उद्देश चांगला जरी असला तरी त्याला अंतर्गत विरोध वाढणार आहे. मंगळवारी उच्चन्यायालयाने सांगितले की,फटाके विक्रीचे जे परवाने दिले आहेत त्यांची संख्याही अर्ध्यावर आणा. या निर्णयावरुन शिवसेना आक्रमक झाली. रोजगार देऊ शकत नाही तर रोजगार हिरावून का घेता? फटाके बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होतो असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वर्षोनुवर्ष साजरे होणारे सर्व कायम स्वरुपी बंद करा. सर्व सणांच्या सुट्याही रद्द करा. तसेच आता फटाकेही व्हाटसअपवर फोडायचे का अशी टीका केली. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात दिल्लीत फटाके विक्रीबंदी कायम ठेवली. दिल्लीत ११ नोव्हेंबर २०१६ पासूनचा फटाके विक्रीच्या बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला. फटाक्यांमुळे दिल्लीत हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली जात असतांना मंगळवारी निवासी भागात फटाके विक्रिला बंदी घातली. खरतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय चांगला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी असे विधान केले होते. कारण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केल्यास राज्यातील हवामान सुधारेल आणि शेवटी शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल, हा त्यांचा उद्देश आहे. मंगळवारी मुंबईत राज्य सरकारतर्फे ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०१७’ आयोजन करण्यात आले. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनीची प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने हे अभियान राबवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणार अशी शपथ घेतली.  न्यायालयाच्या तसेच मुख्यमंत्री,पर्यावरण मंत्र्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याला धर्माशी आणि रोजगाराशी जोडणे चुकीचेच आहे. चेतन भगत यांनी सुध्दा मंगळवारी याला मोहर्रम शी जोडले. खरतर मोहर्रम आणि फटाक्यांचा काहीही संबंध नाही. चुकीची माहिती आणि स्वस्तात प्रसिध्दीसाठी कुणी करत असेल तर त्यामध्ये त्यांचा अज्ञान दिसून येतो. महागाईच्या झळा सोसत असतांना आता फटक्यांवरुन अंतर्गत राजकीय फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. तसेच राज्यातील देशातील मुळ जे प्रश्न आहेत त्यांच्यापासून आपण भरकटत आहोत हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मात्र दिवाळी पर्यंत फटक्यांवरुन राजकीय धूर पसरलेला असेल आणि आरोप प्रत्यारोप बघायला मिळेल.

- Advertisement -