फसवी कर्जमाफी!

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजनेअंतर्गत ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ होणार असा गाजावा सरकारने केला होता. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे असा दावा करण्यात आला होता. परंतु या योजनेचा बोजवारा उडाला. आता पर्यंत पाच हजार शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ झाला. ही योजना इतर योजनांप्रमाणे फुसका बार ठरला. कर्जमाफीची घोषणा होऊन तीन महिने उलटून गेले तरी अजून एक टक्कादेखील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. सरकारच्या तिजोरीतून ३४ हजार कोटी मोजून ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा दावा सरकारने केला होता. मात्र आतापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. सरकारने जाचक नियम, अटी, शर्ती लावून योजने पासून वंचित ठेवण्याचा डाव आखला. ही योजनाच अडकून पडल्याचे दिसून येते. हे सरकार कर्जमाफीच्या विरोधातच होते. कर्जमाफीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, आघाडी सरकारच्या काळातील कर्जमाफीचा लाभ धनदांडग्यांना झाला, अशी कारणे पुढे करीत कर्जमाफी टाळली जात होती. कर्जमाफीसह खते, बी-बियाणे व कीटकनाशकांना अनुदाने देण्याऐवजी मुद्दलात शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवून शाश्वत उत्पन्न घेतले पाहिजे, अशी ओरड करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी धोरणांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्य़ांना या माध्यमातून हातभार लावून त्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित करणे, हे कोणत्याही सरकारचे कर्तव्यच असते. जो नियम उद्योगांना, तोच शेतीला लावला तर त्यात वावगे ते काय? शेतकऱ्यांना संपावर जावे लागले. कर्जमाफी देतानाही सरकारने अटी निर्थीचे कासरे असे जोरकस आवळले की, माफी नको पण हे झंजट आवरा म्हणण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. सातबारा उतारे, बँक खाते, आधार, पॅन असे सर्व पुरावे दिले होते. खील कर्जमाफीला विलंब का होतोय? की मुद्दाम ही प्रक्रिया लांबविली जातेय? कर्जमाफी आणि नोटाबंदीच्या निर्णयात बरेच साम्य दिसते. ज्यांनी कर्जमाफीची मागणी केलेली नाही, अशांची नावे लाभार्थीच्या यादीत आली आहेत, तर जे खरोखर पात्र आहेत, त्यांची नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. हे का आणि कोण करीत आहे? कृषी आणि सहकार खात्याच्या मंत्र्यांनी मोघम भाषणबाजी न करता एकत्र बसून सगळी यंत्रणा फैलावर घेतली पाहिजे. नोटाबंदीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकांवर तर कर्जमाफीने दुहेरी संकट आणले आहे. कर्जमाफीचे पैसे सरकार देईल तेव्हा देईल; पण सध्याचा अर्थव्यवहार थांबल्याने या बँकांची कोंडी झाली आहे. अशा सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे सत्ताधाऱ्यांनी बारा वाजवले. मात्र शेतकरी ज्या दिवशी या सत्ताधाऱ्यांवर निवडणूकीच्या काळात आसूड ओढला तर वेगळेच चित्र निर्माण होईल. मात्र शेतकऱ्यांना झुलवत ठेवून त्यांच्या सोबत अन्याय करण्यात आला एवढे मात्र निश्चित.

- Advertisement -