सत्ताधाऱ्यांना परतीचा इशारा!

- Advertisement -

नांदेड– वाघाळा महानगरपालिकेच्या निकालाने राज्यात काँग्रेसला पुन्हा ऊर्जा मिळाली. महापालिकेत ज्या पध्दतीने पराभव झाला तो सत्ताधारी भाजपा,शिवसेनेला हा परतीचा इशारा आहे. राज्यात,देशात महागाई,वस्तू सेवा कर,शेतकरी कर्ज माफी,बेरोजगारी अशा विविध मुद्दयांवरुन जनतेच्या मनात चिड निर्माण झालेली आहे. त्याचाच प्रत्युत्तर आज नांदेड वाघाळा निकालावरुन सत्ताधाऱ्यांना मिळालेले आहे. खोटी आश्वासने,व भूलथापांना जास्त दिवस जनता बळी पडत नाही. ज्यावेळी उद्रेक होतो त्या दिवशी जनता त्यांना मतांमधून प्रत्युत्तर देते हे त्याचेच नांदेड निकालाचे उत्तरातून देण्यात आले. केंद्र,राज्य सरकारने ज्या पध्दतीने हिटलरशाही प्रमाणे निर्णय घेण्याचा सपाटा लावला, आणि त्याचा फटका छोट्या मजुरापासून तर व्यापाऱ्यापर्यंत बसला हे विसरुन चालता येणार नाही. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकावून अशोक चव्हाण यांनी भाजपची राज्यातील घोडदौड रोखण्याबरोबरच स्वत:चा राजकीय करिष्मा सिद्ध केला आहे. नारायण राणे यांनी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर टीकेची तोफ डागली होती. राज्यातून काँग्रेस संपवण्यासाठी अशोक चव्हाणांचे नेतृत्त्व हातभार लावत असल्याचा आरोप केला होता. आदर्श घोटाळा उघडकीला आल्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून त्यांच्या डोक्यावर सतत चौकशीची टांगती तलवार आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध अक्षरश: रान उठवले. तरीही लोकसभा ते आताची महानगरपालिका निवडणूक प्रत्येक टप्प्यावर चव्हाणांनी जिल्ह्यातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आतापर्यंतचा इतिहास पाहता चव्हाणांसाठी वैयक्तिकदृष्या ही बाब फारच महत्त्वाची म्हणावी लागेल. काँग्रेसच्या बॅ. ए. आर. अंतुले आणि शिवाजीराव निलंगेकर-पाटील या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना चव्हाणांप्रमाणेच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पायउतार व्हावे लागले होते. चौकशीत त्यांचे निर्दोषत्वही सिद्ध झाले. परंतु, राजकीयदृष्या पुन्हा उभे राहण्यास त्यांना खूपच वेळ लागला. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचे पक्ष संघटनेतील वजन फारसे कमी झाले नाही. इतर काँग्रेस नेत्यांच्या तुलनेत ते राजकारणात कायमच सक्रिय होते. लोकसभा निवडणुकीवेळी मोदीलाटेत राज्यभरात काँग्रेसचे पानिपत झाले असताना नांदेड आणि हिंगोली या दोनच मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले. त्यानंतर विधानपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने चव्हाणांच्या नेतृत्त्वाखाली यश मिळवले आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा महानगरपालिकेत निर्विवाद यश मिळाल्याने चव्हाण यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. सरकारने ज्या चुका आता पर्यंत केल्या आहेत त्याबद्दल नागरिकांमध्ये चीड आहे. केंद्रातील सरकारला साडेतीन वर्षाचा कालावधी उलटला,तर राज्य सरकारला ३१ ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होतील. परंतु एकही काम जनतेच्या हिताचे झाले असे सरकारला व त्यांच्या मंत्र्यांना दाखवता येणार नाही. जनतेच्या समाजा समाजामध्ये दुफळी निर्माण होईल असेही वातावरण नको. जनतेला राज्याचा देशाचा विकास हवा आहे. जर सरकार ते पूर्ण करु शकत नसेल तर त्यांना बाजूला फेकण्याचे काम जनता करत असते हे सत्ताधाऱ्यांनी वेळेवरच समजून घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -