हकनाक नरबळी घेणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर खटले भराच!

- Advertisement -

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत २३ हकनाक लोकांचा नरबळी गेला! संपूर्ण घटनेमुळे मनं सुन्न झाली!! कुणाची आई तर कुणाचा मुलगा, तर कुणाचे वडील! तर कुणाच्या घरातील कर्ताधर्ता, या चेंगराचेंगरीत बळी गेला. या घटनेनंतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. चौकशी कशासाठी करतात. नरबळी घेणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर खटले दाखल करा. चौकशीचे नाटक कशासाठी आणि कुणासाठी करणार! एल्फिन्स्टन  पुला संदर्भात नागरिकांच्या खूप वर्षापासून तक्रारी होत्या. या ब्रीजसाठी २०१५ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मान्यता दिली होती. २०१७ उजाडले जर मंजुरी दिली होती तर कामाच्या निविदा का काढण्यात आल्या नाही. २३ लोकांचा नरबळी घेण्याची सरकार जबाबदारी बघत होती का? याचा जाब प्रशासन,सत्ताधाऱ्यांना द्यावाच लागेल. जर मंजुरी मिळाली होती तर या कामाला सुरुवात का झाली नाही. याला जबाबदार कोण आहे त्यांचेही नावे समोर आली पाहिजे. किड्या मुंग्या सारखी माणसे दररोज लोकलने प्रवास करतात. रेल्वे प्रशासनला याचे काहीही देणे घेणे नाही.

रेल्वे अधिकारी एसीमध्ये प्रवास करतात त्यामुळे त्यांना याची जाण नाही. आज प्रत्येक रेल्वेस्थानकाच्या ब्रीजवर दोन बाजुंनी फेरीवाल्यांनी जागा व्यापून टाकली आहे. फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. कारण अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांकडून हप्ते मिळतात त्यामुळे सर्व काही खुलेआम चालत आहेत. मात्र फेरीवाल्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. फेरीवाल्यांचाही बंदोबस्त होणे गरजेचे आहे.  लोकलने दररोज ७० लाख प्रवासी करतात. गेल्या ९ महिन्यात ४८० लोकांचा लोकल अपघातात जीव गेला. वर्षाला हा आकडा तीन हजाराच्या आसपास असतो.  आज देशाचा विचार केला तर देशभरात आज आठ हजार रेल्वेस्थानक आहेत. दररोज २ कोटी ३० लाख प्रवासी प्रवास करतात. तीन वर्षात पावणे चारशे रेल्वे अपघात झाले. एकूण १लाख २१ हजार रेल्वे पुलांपैकी ७५ टक्के पुलांचे आयुष्य संपले आहेत. ८२ पूल आहेत ६० वर्षापूर्वीचे अधिक जुने आहेत. काही पुलांनी शंभरी ओलांडली आहे. सर्व पूल बांधण्यासाठी १९९८ मध्ये हंसराज खन्ना समितीने टास्क फोर्स स्थापना करण्याचे सांगितले होते. परंतु १९ वर्ष उलटूनही काहीच झाले नाही. रेल्वेने २०१५…१६ मध्ये पुढील पाच वर्षात ८.५५ लाख कोटी रुपयांच्या गलेलठ्ठ गुंतवणूक योजना सुरु केली. १ लाख कोटी रुपयाचे सुरक्षा कोष स्थापन करण्यात आले मात्र रेल्वेकडे इतका पैसा आहे का? योजनांची घोषणा करायची मात्र रेल्वेची परिस्थिती सुधारण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांमुळे,सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हकनाक बळी गेले. नागरिक शांत आहे तो पर्यंत शांत आहे. मात्र ज्या दिवशी प्रवाशीं संतापले त्या दिवशी मोठा उद्रेक होईल याचे भान रेल्वे प्रशासन,सरकारने घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -