Saturday, April 20, 2024

‘चमचे चोर’!

भारताचा अस्मितेचा प्रतीक असलेला ‘कोहिनूर हिरा’ इंग्रजांनी चोरल्याच्या कथा आजही भारतात चर्चिल्या जातात. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लंडन दौऱ्यावेळी शिष्टमंडळात सहभागी असलेल्या वरिष्ठ बंगाली पत्रकाराने मेजवानीवेळी चक्क चांदीच्या चमच्यांवरच डल्ला मारला. पत्रकार तसे बदनामच असतात परंतु ‘चमचे चोर’ पत्रकारांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. लोकशाहीचा चौथास्तंभ समजल्या जाणाऱ्या माध्यमांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कारण काही माध्यम हे एका विशिष्ट पक्षाची आणि त्यांच्या नेत्याची दलाली करतात. त्यामुळे सर्वच पत्रकार आणि माध्यम हे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे दलाल असतात असा समज झालेला आहे. ‘आमार सोनार(सोन्याचा) बांगला’ असे रविंद्रनाथ टागोरांनी केलेले बंगालचे सार्थ वर्णन एका वरिष्ठ पत्रकाराच्या प्रतापामुळे ‘आमार रुपोर(चांदीचा) बांगला’ करण्याची वेळ ओढावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लंडनच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळात उच्चपदस्थ अधिकारी, माध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. लंडनमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिष्टमंडळाकरता खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीकरता दोन्ही बाजूंकडील वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. मेजवानी ऐन रंगात आली असताना उपस्थित सुरक्षारक्षकांना सीसीटिव्हीत वेगळ्या हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आले. भारतीय शिष्टमंडळातील काही पत्रकार आपल्याजवळील बॅगेत टेबलावरील चांदीचे चमचे टाकत असल्याचे दिसून आले. यजमानांचा अपमान नको म्हणून सुरक्षारक्षकांनी कानाडोळा केला. मात्र, घडलेला प्रकार थांबत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी काही वेळानंतर ‘त्या’ पत्रकारांना बाब लक्षात आणून दिली. असे काही घडले नसल्याचा सुरुवातीला सांगणाऱ्या पत्रकारांना सीसीटिव्हीत आपला प्रताप कैद झाल्याचे सांगितल्यावर सहभागी एका पत्रकाराने कबुली दिली. मात्र, दुसऱ्या पत्रकाराने नकार दिला. त्याला सीसीटिव्हीमध्य़े आपला प्रताप कैद झाल्याचे सांगितल्यावर त्याचे अवसानच गळाले. पोलिसांना बोलविण्याची तंबी दिल्य़ावर अखेर त्याने चमचा चोरल्याची कबुली दिली. प्रतापी महाशयांना ५० पौंडाचा (४,३०० रुपये) दंड आकारला. यापूर्वीही त्यांनी बॅनर्जी यांच्या अनेक दौऱ्यात सहभाग घेतला आहे. आज मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांचा दौरा या चमचे चोर पत्रकारांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. खरतर पाकिट पत्रकारांच्या व अशा प्रवृत्तींच्या पत्रकारांमुळे संपूर्ण पत्रकार बदनाम होतात. आज बरेच पत्रकार हे बाहेर बातम्यांसाठी गेल्यानंतर  चहा सुध्दा घेत नाहीत. काही पत्रकार तर पत्रकार परिषद,तसेच पार्ट्यांमध्ये फुकटाची इतकी रिचवतात की त्यांना कधी दारु भेटलीच नाही. अशा प्रवृत्तीमुळे संपूर्ण माध्यमे बदनाम झाले. त्यामुळे पत्रकारांनी स्वत: सुधारण्याची गरज आहे. समाजात पत्रकारांना मोठा सन्मान दिला जातो. परंतु पत्रकारच फुकटाची दारु ढोसत असतील आणि चोऱ्या करतील तर इतरांबद्दल बोलण्याचा,लिहीण्याचा आपल्याला अधिकार राहणार नाही. हे वेळेवर समजून घेणे गरजेचे आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments