Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखजातिअंताचा लढा गतिमान करण्याची गरज!

जातिअंताचा लढा गतिमान करण्याची गरज!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक समतेची संकल्पना जाती निर्मूलनाच्या सिद्धांतावर आधारित आहे. बाबासाहेबांना खरे तर जातिअंताद्वारे राजकारण, समाज, धर्म व अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांत समता व सहजीवन अभिप्रेत होते. जातिप्रथा हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीशी निगडित असल्यामुळे जातिव्यवस्थेला आधारभूत असणाऱ्या धर्मग्रंथांना व हिंदू संस्कृतीला पूर्णपणे नकार दिल्याशिवाय जातिअंत होणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. जातिअंतासाठी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करतानाच बुद्धिवाद्यांनी जातिव्यवस्थेविरोधी लोकप्रबोधन केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद करून ठेवले. शूद्र, आदिवासी, अस्पृश्य वर्गाने एक राजकीय आघाडी करून जातिसंस्थेविरुद्ध लढा उभारला पाहिजे, असे बाबासाहेबांचे सांगणे होते. बाबासाहेबांनी मांडलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्याशिवाय भारताचे सुप्त सामर्थ्य प्रकट होणार नाही; अन्यथा भारत आणि भारतीय संस्कृती यांच्या कपाळी विनाश लिहिलेला आहे. जितक्या प्रमाणात बाबासाहेबांचे महान विचार प्रत्यक्षात साकार होतील तितक्या प्रमाणात देशाचा विनाश टळेल. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील जातिअंत होऊन समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूभावाचा आपल्या समाजात उदय झाला आहे काय? नाही. मुळीच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा येथील जातिग्रस्त समाजव्यवस्थेने पदोपदी अपमान केला. त्यांना शिव्याशाप दिले. बाबासाहेब म्हणूनच म. गांधींना म्हणाले होते, ‘गांधीजी मला मातृभूमी नाही.’ बाबासाहेबांनी गांधीजींजवळ जी वेदना व्यक्त केली होती, त्या वेदनेत आजही फारसा फरक पडलेला नाही. कारण, आजही जातीय मानसिकतेतून देशभर दलित समाजावर अत्याचार होतच असतात. दलित माणसे शिक्षण घेतात, चांगले राहतात, आंबेडकर जयंती साजरी करतात, स्वाभिमानाने राहतात, गावकीची कामे नाकारतात. म्हणजे आपली पायरी सोडून वागतात, असे समजून त्यांच्यावर अत्याचार करणे हा जणू काही आपला मूलभूत जन्मसिद्ध अधिकार आहे, असे मानून येथील जातिग्रस्त समाजव्यवस्था दलित समाजावर राक्षसी अत्याचार करीत असते. अशा स्थितीत दलितांनी अत्याचारविरोधी आवाज उठविला, तर त्यांना सुरक्षाकवच म्हणून लाभलेला अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा बदला, त्यांच्या सवलती बंद करा, अशी मागणी होताना दिसते. हे सारे प्रकार म्हणजे दलितविरोधी जातीय मानसिकतेचे भेसूर नि कुरूप नमुने आहेत; पण या अन्यायाविरुद्ध बहुसंख्याक समाज दलितांच्या बाजूने उभा राहावयास तयार नाही. असे का होते? तर आपणाकडे लोकनिष्ठेचा अभाव आहे म्हणून! बाबासाहेबांच्या समग्र सामाजिक समतेचा संघर्ष पाहता ते प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरुद्ध लढत होते हे उघड आहे. त्यांची ती प्रस्थापितविरोधी लढाई अजूनही संपलेली नाही. जात संपलेली नाही. जातीच्या मुळाशी असलेल्या धर्मव्यवस्थेवर बाबासाहेबांनी घणाघाती हल्ले केले; पण जातीचा आधार असणारा धर्मच आज राजकारणात प्रभावी होत आहे. धर्मचिकित्सा करणाऱ्यांच्या हत्या होत आहेत. जातीचे मोर्चे निघत आहेत. जातीचा अडथळा राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या आड येत आहे. अत्याचारातही जात शोधली जात आहे, अत्याचारविरोधी जातिधर्मनिरपेक्ष लढा उभारण्याची गरज कुणालाही वाटेनाशी झाली आहे. दलित अस्वस्थ आहेत. जातीमुळे ‘एक राष्ट -एक समाज’ उभा करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. दलित समाजावर एकीकडे अमानुष अत्याचार होत असताना दुसरीकडे दलितांची राजकीय चळवळ मात्र सत्ता, संपत्ती, नेतृत्वाचे हेवेदावे, अहंकार या समाजविघातक दुर्गुणांत गुरफटून छिन्नभिन्न झाली आहे. आता तर दलित नेतृत्वाचे इतके वैचारिक अध:पतन झाले आहे की, दलितांचे राजकीय संघटन फुटल्यामुळे आणि आंबेडकरी समाजातच शत्रुत्व वाढल्यामुळे खेडोपाडी दलित समाजावरील अत्याचार वाढले आहेत. बाबासाहेबांचे स्मरण करताना सर्वांनी अंतर्मुख होऊन त्यांचा जातिअंताचा लढा गतिमान करण्याची गरज आहे. तर बाबासाहेबांना तीच खरी आदरांजली ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments