Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखनथुरामवाल्यांना चपराक!

नथुरामवाल्यांना चपराक!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या कुणी केली हे पुन्हा न्यायालयाने स्पष्ट केले. नथुरामचा उदो उदो करणारे तोंडावर आपटले. महात्मा गांधींच्या हत्येला या महिन्याच्या अखेरीस ७० वर्षे पूर्ण होतील. त्यांची हत्या हिंदुत्ववादी विचारांच्या नथुराम गोडसेने केली, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्याला अटक झाली, न्यायालयात खटला चालला आणि नथुरामला शिक्षाही झाली. परंतु नथुरामाचा उदो उदो करणाऱ्यांनी नथुरामने हत्याच केली नाही असा सोंग करुन त्यांच्या कट्टर विचारांचा वारसा चालूच ठेवला. तर नथुरामाचा मंदिर उभारुन आणि त्याची जयंती साजरी करुन एकाप्रकारे महात्मा गांधींच्या हत्येचा समर्थन केला होता. अभिनव भारत या संघटनेने तर नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केलीच नव्हती, असा प्रचार गेल्या काही काळापासून चालवला होता. एवढेच नव्हे, तर नथुरामने नव्हे, तर कुणी तरी अज्ञात इसमाने महात्मा गांधींची हत्या केली, असा दावा करीत, हत्येचा पुन्हा नव्याने तपास करण्यात यावा, अशी याचिका या संघटनेच्या एका कार्यकर्त्याने थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायालयमित्र (अ‍ॅमायकस क्युरी) नियुक्त करून त्यांना याचिकेतील दाव्यांची सत्यासत्यता तपासण्यास सांगितले. त्यांनी त्यात गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनेच केली होती, असे नमूद करून, या याचिकेतील दाव्यांचा पुन्हा तपास करण्याची गरज नाही, असा अहवाल सादर केला असून, त्यामुळे याचिकाकर्त्याला व त्याच्या संघटनेला चपराकच बसली. पण गांधीजींचे विचार मात्र कुणी विसरू शकत नाही. जगभरात गांधीजींचे स्मरण केले जाते आणि भारतात तर गांधींजींचे विचार न मानणाऱ्यांनाही निवडणुकीच्या राजकारणासाठी का होईना, त्यांचे नामस्मरण करावे लागते. पण अलीकडील काळात त्यांचे नाव घेत, त्यांची अप्रत्यक्षपणे बदनामी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. एकीकडे राष्ट्रपित्याचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या चुकांमुळेच भारताची शकले झाली, त्यांनी पाकिस्तानला स्वत:हून ५५ कोटी रुपये दिले असे सांगायचे, त्यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाला पूर्णपणे फाटा द्यायचा आणि केवळ स्वच्छतेपुरते महात्म्याला लक्षात ठेवायचे, हे वारंवार दिसत आहे. अनेक जण तर गांधीजींच्या हत्येचे उघडपणे समर्थन करतात, नथुराम गोडसेने जे केले, ते योग्यच होते, असे म्हणतात आणि नथुरामच्या नावाने कार्यक्रमही घेताना दिसतात. खरे तर आधी नीट खटला चालून, त्यात नथुरामनेच हत्या केल्याचे सिद्ध झाले असल्याने सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेचा विचार न करता तिथल्या तिथे ती फेटाळायला हवी होती. या निर्णयानंतर तरी नथुरामचे गुणगान करण्याचे संबंधितांनी थांबवायला हवे. पण तशी शक्यता नाही. गांधीजींना न मानणारे अनेक जण सत्तेतच असल्याने, नथुरामच्या समर्थकांचा जोर वाढताना दिसत आहे. पण अशा स्वरूपाच्या याचिका न स्वीकारण्याचा निर्णय न्यायालयांनीच घ्यायला हवा. त्यात निष्कारण वेळ जातो आणि साध्य मात्र काही होत नाही. त्या वेळेत इतर खटले तरी निकाली निघू शकतील. आपला इतिहास गौरवशाली असला तरी त्यात गुंतून पडण्यापेक्षा, त्याआधारे भविष्यकाळही अधिक गौरवशाली बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. इतिहास हा ओझे बनणार नाही, याची दक्षता घ्यायलाच हवी. आता तरी नथुरामाचा उदो उदो बंद करुन महात्मा गांधीच्या हत्येबद्ल दु:ख व्यक्त करुन माफी मागावी एवढेच.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments