Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखरावते मुजोरच!

रावते मुजोरच!

‘प्रवांशाच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन रस्त्यावर धावणाऱ्या एस. टी. महामंडळाला अनेक घोटाळ्यांनी घेरल्यामुळे एस.टी तोट्यात चालली अशी ओरड होते. ही ओरड आजपासून नाही तर अनेक वर्षापासून होत आहेत. एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले ते योग्यच होते. अर्थातच एस. टी. ची व्यावसायिक भरभराट झाल्याशिवाय तोटा भरून निघणार नाही आणि वाढत्या उत्पन्नातील वाटा कर्मचाऱ्यांना देणे शक्य होणार नाही. सध्या चालकांना ४७००-१५,३६७ आणि वाहकांना ४३५०-१४,२२५ रुपये पगार मिळतो, नव्या किमान वेतनापेक्षाही तोकडा आहे. अशा आर्थिक स्थितीत घर खर्च भागवायचा कसा? हा त्यांचा सवाल चुकीचा आहे, असे म्हणता येत नाही. मात्र त्यांच्या आंदोलनाच्या वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जी मुजोरीची भाषा केली ती निषेधार्थ आणि संतापजनक आहे. रावते यांच्याशी एका व्यक्तीने दूरध्वनीवरुन संभाषण करुन आंदोलना बाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी रावते हे कीती मुजोर आहेत हे समोर आले. जबाबदार महामंडळाच्या मंत्र्यांकडून उध्दट भाषा वापरुन त्यांनी अकलेचे तारे तोडले. सर्वसामान्य कर्मचारी हा कुटुंबाचा उदरर्निवाह करण्यासाठी रात्रंदिवस सेवा करतो. सेवा करतांना त्याला मेहनतीचा मोबदलाही दिला जात नाही ही एक शोकांतीकाच. संपकरी संतप्त असतानाच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुढील २५ वर्षांत सातवा वेतन आयोग देता येणार नसल्याचे ठणकावत निलंबनाच्या तसेच गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईचा दम भरला होता. त्यांची भाषा अशोभनीय आणि असंवेदनशील होती. या मागण्या जर मान्य केल्या तर सुमारे ४ हजार ३०० कोटींचा बोजा पडेल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेळ काढूपणा केला. मागच्या वर्षी वेतनवाढीचा मुद्दा औद्योगिक न्यायालयात नेला, तेव्हा रावते यांनीच एस. टी. कर्मचारी संघटनांमध्ये फूट पाडून शिवसेनाप्रणीत संघटना बळकट करण्याचे प्रयत्न केले. वर्षभरापासून चर्चेत असलेला वेतनवाढीचा तिढा सोडवण्यासाठी रावते यांनी पुढाकार घेतला असता तर कदाचित त्यांचा मनसुबा सिद्धीस गेला असता. सरकारच्या आडमुठधोरणामुळे राज्यभरात ७० लाख प्रवासी वेठीस धरण्यात आले, एस. टी. ला १२५ कोटी पेक्षा जास्त फटका बसला. एस. टी.चे अर्थचक्र मुख्यत: ७८ टक्के ग्रामीण प्रवाशांच्या भरवशावर चालते. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी प्रवास करतात, दिवाळीत ही संख्या ८५ लाखांच्या आसपास असते. उल्लेखनीय म्हणजे २०१२-१३ मध्ये एस. टी. चा संचित तोटा ७२१ कोटी होता तो आता ३ हजार कोटींच्या आसपास पोहचला असून त्यात वाढच होत आहे. जो पर्यंत भ्रष्टाचारी किड दूर होत नाही तो पर्यंत एस.टी खड्यातच चालणार? कर्मचाऱ्यांनी या वेळी संयमाची भूमिका घेतली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्तच आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पुढे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वेगळा स्फोट होईल. हे सरकारने आणि प्रशासनाने समजून घेणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments