Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमोदी आणि शाह यांच्या मोदीशाही खाली बांधील असलेल्या भारतीय जनता पक्षाला ब्रँड...

मोदी आणि शाह यांच्या मोदीशाही खाली बांधील असलेल्या भारतीय जनता पक्षाला ब्रँड काय असते आणि ब्रँडचे महत्व काय असते, याची उत्तम रित्या जाणीव आहे

Amit Shah, Narendra Modi, Modi, Shah, BJP, Bharatiya Janata Party, Congress

भाजपाचे पक्षीय राजकारणापेक्षा आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या ब्रँडची खांडोळी कशी करता येईल, यातच जास्त रस आणि आसुरी समाधान वाटते.

राजकिय पटलावर नुकतेच उदयास आलेले शिव सेनेचे युवा, मन मिळावू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले आदित्य ठाकरे हेच आजघडीला भाजपाचे नवीन लक्ष्य आहेत.

निश्चितच सुशांत सिंह राजपूतचा अकाली मृत्यू ही एक असह्य घटना आहे. मात्र या घटनेच्या परिघाभोवताली घिरट्या घालणारे राजकारण अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचे आणि गलिच्छ असून ते कुणाचाच पिच्छा सोडत नाही. अगदी सुशांत चा दुःखद दुर्दैवी मृत्यू सुद्धा याला अपवाद नाही.

भारतीय जनता पक्षाला हे उत्तमरीत्या माहीत आहे की, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक अत्यंत सुशील, प्रेमळ, निर्मळ, स्वच्छ प्रतिमेचा तरुण आदित्य, आदित्य ठाकरे यांच्या रुपात उगवलेला असून निश्चितच हे आकर्षक ब्रँड भारतीय जनता पक्षाची भळभळणारी जखम आहे.

हाच ब्रँड नष्ट करण्याची उत्तम संधी म्हणजे बॉलीवुड अभिनेता सुशांतचे मृत्यु प्रकरण. या संधीचे सोने करण्यात भाजपाने कोणतीही कसर ठेवली नाही.

आपण राजकुमार असून पक्षीय राजकारणापेक्षा आपण राजकुमार आहोत, हे जनतेला भासविण्यात अधिक रस आहे, अशा खोडसाळ प्रचाराच्या चक्रव्यूहात अडविण्यात भारतीय जनता पक्षाला विशेष प्रावीण्य प्राप्त आहे.
नेमके हेच चक्रव्यूह भाजपाने आदित्य ठाकरे यांच्यासाठी निर्माण केले.

ही बाब वेगळी की, विरोधकांना पूरक असणारी आपली शाही प्रतिमा निर्माण करण्यासाठी अगर विरोधकांच्या हाती आयते कोलीत देण्यासाठी राहुल गांधी यांना कुण्या बाहेरच्या लोकांची मदत घ्यावी लागली नाही.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या पटलावरील एक तरुण, मनमिळाऊ चेहरा म्हणजे आदित्य उदयास येत आहेत. शिवसेनेच्या भूतकाळातील जहाल प्रतिमेला देखील सौम्य स्वरुप देण्याचे राजकीय कसब व उत्तम कौशल्य त्यांच्यात आहे.

त्याचप्रमाणे भूतकाळातील जहाल धोरणास वर्तमान काळातील मवाळ धोरणाच्या मार्गावर आणणारे हे नेतृत्व असून त्यांची ही राजकिय शैली भाजप करिता अत्यंत घातक आहे व याची भाजपाला अतिशय उत्तम रित्या जाणीव आहे.

मग हे घातक असलेले आदित्य ब्रँड कसे मलीन करायचे, आणि आपल्या राजकीय मार्गातील हा अडथळा कसा दूर करायचा, यासाठी भाजप एक डाव खेळत आहे.

सुशांतच्या दुर्दैवी मृत्यूच्या आदल्या रात्री झालेल्या त्याच्या पार्टीत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री हजर होते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले असल्याचा जबरदस्त बनाव भाजपाने केला.

युवा आणि प्रतिभावंत सुशांतच्या सरणावर बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकांची पोळी भारतीय जनता पक्ष भाजून घेत असल्याचे दिसते.

मात्र या कठीण प्रसंगातून आदित्य ठाकरे कसा मार्ग काढतात, पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आदित्य ठाकरे यांची वैयक्तिक प्रतिमा स्वच्छ असून हेच त्यांचे राजकीय भांडवल आहे. याच बळावर त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केलेली आहे.

मुळात ठाकरे हे नावच राजकिय वारसा आणि उत्तरदायित्व यांचे सुरेख मिश्रण आहे.

सुरुवातीला मराठी बाणा वापरून प्रादेशिक व्यासपीठावरून राजकारणाची हाक देणार्‍या शिवसेनेचा प्रवास प्रखर प्रतिगामी राजकारणाकडे वळला आणि कट्टरवाद्यांनी याचा स्वार्थी राजकारणासाठी पुरेपुर वापर करून घेतला.

परिणामी प्रगतिशील, सर्वसमावेशक आणि पुरोगामी विचारांचा मतदार मोठ्या प्रमाणात दुरावला.

आज आदित्य ठाकरे आपल्या जहाल राजकीय वारसा आणि वर्तमान मवाळ राजकारण, या दरम्यानची भूमिका अत्यंत सावधपणे साकारण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मुंबई शहरातील पर्यावरण प्रेमींच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपल्या पुरोगामी, मृदू आणि मवाळ भूमिकेच्या भात्यातून भाजपाच्या छाताडावर डागलेले आदित्यास्त्र होय.

2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच आदित्य ठाकरे यांचे राजकारणातील सर्व डावपेच खेळून झाले होते.

राज्यात मोठ मोठे दौरे करून विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली लोकप्रियता आणि राजकिय कौशल्याचे जनतेसमवेत भाजपलाही दर्शन घडविले व आपल्या राजकीय कारकीर्दीचा जोरदार ठसा उमटविला.

मुंबईतील नाइट लाइफ उघडणे, कलाकारांना जागा उपलब्ध करून देणे, उच्च शिक्षणात सुधारणा घडवून आणणे आणि यासारख्या त्यांच्या घोषणा म्हणजे आदित्य हे तरुणाईचा बुलंद आवाज असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित झाले.

महाराष्ट्रातील निवडणुकांत भाजपाला एका झटक्यात मागे टाकून शिवसेनेने अलीकडे चमकदार कामगिरी करून दाखविली. एवढेच नव्हे तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती करून सत्तेवर देखील आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अति तरुण चिरंजीव आदित्य ठाकरे इतक्या कमी वयात मंत्री झाले. अर्थातच ही बाब शिवसेनेत नवचैतन्य निर्माण करणारी आणि विरोधकांच्या जखमांवर मीठ चोळणारी बाब आहे.

आंध्र प्रदेशचे जगमोहन रेड्डी यांनी सुद्धा हे दाखवून दिले की, राजकारणात न्यू जेनेरेशन कार्ड योग्य पद्धतीने खेळल्यास जनाधार वाढून पक्षाला किती जोरदार फायदा होतो.

शिव सेनेचा हाच नवा कोरा करकरीत ब्रँड आपल्यासाठी प्रचंड घातक असल्याची तीव्र जाणीव झाल्यानेच भाजपा हा ब्रँड मलीन, बदनाम वा नष्ट करण्याची तयारी करीत आहे.

याच तयारीचा भाग म्हणून भाजप सुशांतच्या मृत्यु प्रकरणाच्या चालून आलेल्या आयत्या संधीवर राजकिय डाव खेळत आहे.

महाराष्ट्राचे ठाकरे सरकार कुणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा उघड आरोप माजी शिवसैनिक आणि आताचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला.

तसेच त्यांचे चिरंजीव नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

बिहारचे भाजपा प्रवक्ते निखिल आनंद यांनी सुशांत प्रकरणात आदित्य यांच्या मौन धारण करण्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला. सोबत सुशांतविरोधी षडयंत्र उभाणार्‍यांना पाठींबा देत असल्याचा आरोपही केला.

अशा रीतीने भाजप जनतेत मोठ्या प्रमाणात बदनामीकारक कुजबूज निर्माण करून सुशांत मृत्यू प्रकरणाच्या सरणावर घाणेरड्या राजकारणाची पोळी भाजून घेत आहे.

ज्यांना महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रियतेमुळे धोका उद्भवण्याची भीती वाटते, तेच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या आडून माझ्यावर व ठाकरे परिवारावर हकनाक चिखलफेक करून आपल्या पराभवाचा वचपा काढीत आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.

हिंदी चित्रपट सृष्टीत मित्र असणे, हा काही गुन्हा नाही, असेही चिरंजीव ठाकरे म्हणाले.

तरुण राजकारण्यासाठी अशा स्वरूपाचे विधान करणे हे भाजपकरिता राजकीय फायद्याचे असून भाजपनेच तयार केलेल्या आरोपीच्या पिंजर्‍यात स्वतःला उभे करण्यासारखे आहे.

शिवाय ग्लॅमर जगातील लोकांशी मैत्री असणे हा गुन्हा नसला तरी सर्वसामान्य लोकांशी दुरावा आणि झगमगत्या जगाशी जवळीक असल्याचा कबुली जबाब देणे हे विरोधी पक्षाच्या फायद्याचे ठरणारे आहे.

लोकशाही मूल्यांचा लटका आव आणून एखाद्यास राजकुमार संबोधून हिणवणे, त्याचे काव्यात्मक व अतिरंजक चित्र निर्माण करून लोकशाही मूल्यांना बाधा येत असल्याचे दाखविणे, हे भाजपसारख्या पक्षाला अत्यंत सोपे काम आहे. आणि ते ही अशा प्रसंगी की जेव्हां त्यात मोदी आणि शाह सारखे मुरब्बी, बोलघेवडे, कष्टाळू स्वयंसेवक राजकारणी असतील तर प्रश्नच मिटला. कारण समोर आहे ते तरुण पिढीचा चेहरा असलेले, उज्ज्वल भवितव्यासाठी हात उंचावताच प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळविणारे आदित्य. हे आदित्य मोदी शाह जोडीला मोठे आव्हान उभे करणारे आहेत. अशा परिस्थितीत मोदी शाह ब्रँडेड भाजप हा डाव खेळणार नसेल तर नवलच.
राहुल गांधी याचे उत्तम उदाहरण होय. त्यांच्यासोबत जे केले, तोच कित्ता गिरवत भाजप आदित्याचा राहुल करण्याचा प्रयत्न करीत आहे.

राहुल गांधी यांच्या सुट्ट्या, दीर्घ अनुपस्थिती आणि त्यांचे राजकुमारासारखे वर्तन, यांसारख्या बाबींच्या आधारावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना मोठ्या कौशल्याने लक्ष्य केले आणि राजकारणात ते किती निरुपयोगी व बिनकामाचे आहेत, हे मतदारांच्या मनांत बिंबविण्यात यशस्वी झाले.

याला पलटवार म्हणुन कॉँग्रेस नेत्यांनी देखील बरेच काही केले असले तरी ते मोदी शाह ब्रँड समोर ते फिके पडले.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments