Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखचंदेरी दुनियेत ड्रग्सचा काळोख जुनाच

चंदेरी दुनियेत ड्रग्सचा काळोख जुनाच

“महा घोर काळोख त्यात झगमगती काजवे किती जणू पिश्शाचे भय दाखवाया कोलीते नाचती…”

अशा दोन ओळी लहानपणी कवितेत वाचल्याचे आठवते.विषय निघालाच मुळात चित्रपट सृष्टीचा.

तर चित्रपट सृष्टीच्या या झगमगत्या चंदेरी दुनियेमागे अत्यंत भयावह गडद काळोख दाटलेला आहे. मादक द्रव्यांचे सेवन, कास्टिंग काउच पासून ते काका-पुतण्या वाद आणि यासारखे अनेक अभिशाप या चंदेरी दुनियेतला लागलेली आहेत.

मुळातच मादक द्रव्यांचा वापर कशासाठी केला जातो? तर चित्रपट सृष्टीतील यां स्टार्स मंडळींना आपल्या तालावर हवे तसे नाचविण्यासाठी, त्यांच्याकडून हवे ते करून घेण्यासाठी केला जातो, असेच म्हणावे लागेल.

कसे जडते हे जीवघेणे व्यसन? मर्यादित व निश्चित वेळेत चंद्राला कवेत घेण्याच्या लालसेने पेटून उठल्याने प्रचंड मानसिक तनाव वाढतो.

प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी हवी असते. याच तणावापोटी मेंदूला झिंग आणण्यासाठी, सोबत असलेल्या सहकार्यांच्या नादी लागून आणि यासाठी आवश्यक असलेला भरपूर पैसा असल्यामुळे हे व्यसन जडत असल्याचे दिसते. बरेच कलाकार अत्यंत हळवे, संवेदनशील आणि भावुक असतात.

कुणाशी तरी असलेले भावनिक नाते आणि अहंकार, प्रसिद्धीचा हव्यास अगर यां सारखी भावनिक गुंतागुंत, त्यातून काही हाती न लागल्यास अथवा प्रेयसीने कडून ठोकरले गेल्यास आलेले वैफल्य देखील याला कारणीभूत ठरते. हा तणाव नष्ट करण्यासाठी मेंदू सुन्न करावयाच्या तीव्र इच्छेपोटी मादक द्रव्याचे व्यसन जडते.

सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात याची सुरुवात होते. आणि मग हळू हळू हे व्यसन पूर्णतः आपला पाश आवळत जाते. शेवटी व्यसन त्याच्या जीवनाचा अविभक्त घटक बनतो. यातून सुटका करून घेण्यासाठी कित्येक महिने वा वर्षे प्रचंड कष्ट सोसावे लागतात.

खूप पैसा कमवायचा असतो, खूप प्रसिद्धी मिळवायची असते. त्यामुळे अखंड काम करणे खूपच गरजेचे असते. असा हा प्रचंड व्याप असल्याने हे व्यसन सोडण्यासाठी हवा असलेला वेळ त्यांच्याकडे नसतो.

जर वेळ काढला तर कामाची खोटी होईल, त्यात खंड पडेल आणि प्रगतीच्या संधी हातातून निसटतील आणि ती दुसर्याच एखाद्या नट वा नटीच्या हाती जाईल, अशा भीतीपोटी व अशा विचारातून या व्यसनातून मुक्त होणे शक्य नसते.

अर्थातच व्यसन सोडायचे म्हटले की कामही सोडावे लागले, मोठ्या कष्टाने हाती आलेली संधीही गमवावी लागेल आणि सक्सेस मिळणार नाही. मग अशा परिस्थितीत काय करणार?

पैशाच्च प्रवृत्ती बरोबर जुळवून घेणे भाग असते. आपल्या अमूल्य जीवनाचा सौदाच करावा लागतो. व्यसनाधीनते सोबत जगावे लागते आणि असेच जगणे अपरिहार्य ठरते.

अशाप्रकारे हे सैतानी व्यसन त्याच्या नसानसात भिनते. त्याच्यात आणि व्यसनात लढाई जुंपते, आणि दोघांपैकी कोणी तरी एकच जिंकतो… व्यसन अथवा तो. आर या पार ची परिस्थिती. मधली कोणती वाटच नसते.

हे व्यसन ज्यांना जडत नाही, असे किंचितच काही नशीबवान असतात. मात्र हे व्यसन कुठलाही भेदभाव करीत नाही. एकदा का हल्ला केला की मग समोर कोण आहे, कोण नाही, ते पहात नाही.

सेलिब्रिटीजचे जीवन किती तणावाचे असते, याची कल्पना करणे सुद्धा अवघड आहे. त्यात भरात भर म्हणजे पैशांची खूप रेलचेल असते. सुट्ट्या घालविण्यासाठी जगभर फिरण्यात, मौज मस्ती करण्यात बराच वेळ जातो. रेड कार्पेट अवॉर्ड सारख्या कार्यक्रमांत सहभागी व्हावे लागते. शूटिंग साठी लांब लांब चा प्रवास करावा लागतो. खरे तर सेलिब्रिटी होणे म्हणजे अत्यंत अवघड असते, खूप कठीण जीवन जगणे असते.

कधी काय घडेल, काय बदलाव येईल, सांगता येत नाही. अचानकच कोणी तरी मित्र होतो आणि एखादा मित्र अचानकपणे साथ सोडून जातो. कोण मित्र आणि कोण वैरी, कोण आपला आणि कोण परका, हे समजणे अत्यंत अवघड झालेले असते.

कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये, तेच समजत नाही. प्रत्येकालाच पैसा, काम, कार इत्यादी ऐशो आराम हवा असतो.

यातून बाहेर निघाल्यावर आपल्याला कळते की, विश्वास करण्यासारखे खूप कमीच लोक आहेत आणि ते ही कदाचीत केवळ आपले जवळचेच.

आपण सतत दुर जातो स्वकीयांपासून, सर्वांचे चेहरे संदिग्धतेच्या चिखलात माखलेले, लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात, आपण घेरले जातो, ऑटोग्राफ मागर्यांच्या गराड्यात.

गोंगाट, गराडा, नको नकोसा वाटणारा गोंधळ. जसजसा पैसा खुळखुळायला लागतो, प्रसिद्धीचे वारे वाहू लागतात, तसतसे सार्वजनिक जीवन अवघड होत जाते.

अगदी चालणे फिरणेही दुरापास्त होऊन बसते. मग वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न पडतो. मग मित्र मैत्रिणींच्या पार्ट्या सुरू होतात. मात्र दररोजच्या त्याच त्या गोष्टी आणि तीच ती झगमगाट. वीट येतो अगदी.

मग यात काही तरी नावीन्यपूर्ण असावे वाटते आणि त्यातूनच मद्य, ड्रग्स आणि अशा सगळ्या बाबी असल्याच. यात अनेक प्रकारची माणसे भेटत जातात, चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारची. काही तर चक्क पागल, ध्येय वेडी असतात. कलासक्त असतात.
स्टार होण्यासाठी काहीही करायला आणि कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार असतात. अगदी मादक ड्रग्स घ्यायला सुद्धा. चित्रपट सृष्टीतील काम खूप विचित्र. कधीही हातातून निसटू शकते. काही फ्लॉप चित्रपट खिशात असतात.
हव्या असलेल्या भुमिका मिळत नाहीत. वयाची चाळीशी गाठली असेल, भूमिका मिळत नसतील, प्रबंधककाकडून पिच्छा सोडवायचा असेल, मात्र हिम्मत होत नसेल. कुणाशी तरी प्रेम संबंध जुळलेले असतात. किंबहुना लग्न सुद्धा झालेले असते. मात्र दोघात बिनसलेले असते.

तिचा भत्ता देत देत नाकी नऊ आलेले असते. मागील चित्रपट फ्लॉप झालेले असतात. त्याचे टेन्शन वाढलेले असते.

आपल्यासाठी भूमिका योग्य नाही, हे माहीत असूनही मात्र करीयर बुडण्याचा भितीपोटी नाइलाजाने भूमिका केलेली असते. अशा समस्त तणावातून नियंत्रण राहत नाही आणि ड्रग्स शिवाय पर्याय दिसत नाही.

मग टेन्शन वाढले की ड्रग्सचा डोस देखील वाढत जातो. घराच्या भिंती संकुचित होत जातात. घराबाहेर पडावेसे वाटत नाही. रात्रंदिवस घरातल्या टब मध्ये डोके खुपसून पूर्ण वेळ वाया घालविला जातो. यातून बाहेर पडणे दुरापास्त होऊन बसते.

मग एकच कार्यक्रम सुरू असतो, चार भिंतीत ड्रग्स घेऊन चोविस तास झिंगलेल्या अवस्थेत राहणे…

बस्स…

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments