Wednesday, April 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखआपल्या देशाच्या जनतेला गंडविणार्‍या यां वृत्त वाहिन्या एवढे मोठे, कधीही भरून न...

आपल्या देशाच्या जनतेला गंडविणार्‍या यां वृत्त वाहिन्या एवढे मोठे, कधीही भरून न निघणारे नुकसान करीत आहेत

republic tv, arnab goswami, aajtak, modi media, godi media, press, patrakar, abp news, times now, news nation, zee news, arnab, republic bharat, kangana ranaut

भारतातील बहुतेक माध्यमे काही राजकीय पक्षांविषयी मत्सर बाळगतात तर काही काही पक्षांचा एजेंडा राबवित त्यांचे मुखपत्र झाले असल्याचे दिसतात. यां वाहिन्यांत सर्वांत वरचढ म्हणजे रिपब्लिक टीव्ही, अगदी भाजपचा एजेंडाच या चॅनेलच्या मुखी असतो. मोठ्या धारिष्ट्याने भाजपच्या पीओव्हीचे समर्थन करताना या वाहिनीने भाजपच्या खासदारांना सुद्धा मागे टाकले.लोकांनी मला बेंबीच्या देठापासून अंधभक्त असल्याची ओरड केली. कारण गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणूकीपासून मी भाजपाला मतदान केले. मात्र अंधभक्त होऊन नव्हे तर केवळ मतदार म्हणून.त्या पक्षाने दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची संधी द्यावी, एवढाच यामागे हेतू होता.

अधिकार आणि सरकार, यां बाबीवर विश्लेषणात्मक प्रश्न विचारणे, त्यांची उत्तरे शोधणे, हे एक पत्रकार म्हणून माझे कर्तव्यच. मी हे कर्तव्य कुणालाही न जुमानता बजावीत आहे. मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमांकडे पाहते, तेव्हां मला भीती वाटते. विषय आहे अर्णब गोस्वामी या पत्रकाराचा. अर्णब गोस्वामी जेव्हा भाजपसहित सर्वच पक्षांना चारी मुंड्या चीत करीत, तेव्हां मला त्याचे खूप खूप कौतुक वाटत. आपणही असेच निर्भीड पत्रकार व्हावे, असे मनापासून वाटत.

निश्चितच एकेकाळी तरुण पिढीतील पत्रकारांचा तो आदर्श होता. मात्र आज घडीला त्याने सर्वांचाच अपेक्षा भंग केला. आज त्याला पाहावेसे देखील वाटत नाही. अक्षरशः वीट आला आहे त्याचा.

खरेच आपण माध्यमातील नाइट इन शायनिंग आर्मर ला मुकलो, अशी खंत वाटते. टाईम्स नाऊ मध्ये असताना तो अत्यंत प्रभावीपणे मत मांडत असे, एखाद्या विषयाची निर्भीडपणे चिरफाड करीत असे. अख्ख्या देशात त्याला तोड नाही, असे वाटत. एक सशक्त, देशभक्त, निर्भीड पत्रकार असल्याची उच्च व स्वच्छ प्रतिमा त्याने आपल्या चाहत्यांत निर्माण केली होती. चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या च्या आविर्भावात कोणतेही आव्हान पेलण्यास नेहमीच तयार असे. कोणत्याही पक्षाच्या दबावाला बळी न पडता आणि कुठल्याही लालसेला भीक न घालता कोणतेही आव्हान स्वीकारणार्‍या आणि सडेतोडपणे मत मांडणार्‍या पत्रकारांपैकी तो एक होता. एक दक्ष व सतर्क पत्रकार म्हणून तो देशाच्या शहरी मध्यमवर्गीयांचा चाहता हिरो झाला होता. मात्र आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. अत्यंत दक्ष पत्रकार अशी ओळख असलेल्या या अर्णबची आजची शैली उलट्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे वाटत आहे.

आज हा विषय लिटमस पेपरवर घेणे खूप गरजेचे वाटते. खरे तर वृत्तमाध्यम हे जगातील सर्वात किचकट आणि क्लिष्ट क्षेत्र आहे. असंख्य धूसर छटांनी झाकोळलेले अस्पष्ट असे हे क्षेत्र.

खऱ्या खोट्यातील वस्तुनिष्ठ फरक या धूसर छटांत कधीच मावळून गेला आहे. यातील अंधार आणि काशादरम्यानची स्पष्ट रेषा कधीच पुसटशी झालेली आहे. किंबहुना राजकीय स्वार्थापोटी असे करण्यात आले. यात अर्णब गोस्वामीचीही भुमिका महत्वाची असल्याचे ठळकपणे जाणवते. अर्णब गोस्वामी रीपब्लिकन टी व्ही मध्ये गेला आणिमला देखील याचा खूप आनंद झाला होता त्यावेळेस. मात्र तो तिथे गेला आणि पत्रकारितेला काळिमा फासणारी अवदसा मानगुटीवर बसली. रिपब्लिकन टीव्ही च्या प्रेक्षकांना एखाद दुसर्‍या वेळी कदाचीत असे वाटलेही असेल की बातम्यांकडे पाहण्याच्या अथवा बातम्या दाखविण्याचा चॅनेलचा दृष्टीकोन थोडा पक्षपाती झाला. हळूहळू माझाही आनंद पार मावळून गेला. टाइम्स नाऊमध्ये तो मुख्य संपादक झाला हे सुद्धा नंतर मला कळले.

त्याच्या पत्रकारितेचे निकष लावण्याची हीच वेळ होती. आता तर तो रिपब्लिक टी व्ही मध्ये प्रमुख गुंतवणूकदार आहे. जोडीला एक भाजप नेता सुद्धा त्यात मुख्य प्रायोजक व भागीदार आहे. त्यामुळे बातम्यांचा दृष्टिकोन बदलणार अथवा भाजपच्या रंगात रंगणार, हे नक्की. हे चॅनेल भाजप समर्थकांचे, उजव्यांचे सर्वाधिक लाडके, वंदनीय आणि प्रिय आहे. तसेच उजव्या, भाजप समर्थक विचारधारा असलेल्यांना त्याच्या पॅनेलवर बोलण्याची अधिकाधिक संधी मिळणार आणि विरोधकांना झोडपून काढण्यासाठी, अपमानास्पद टीका झेलण्यासाठी बोलावले जाणार, हे ही नक्की. विशेष म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या अँकरमध्ये द्विध्रुवीय स्वरूपाची विकृत मानसिकता अगदी स्पष्टपणे दिसू लागते. पत्रकारिता एक अतिशय शक्तिशाली व प्रभावी व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून प्रत्येक मुद्दा लोकांपर्यंत सहजपणे पोचवता येतो.

मात्र दुर्दैव! असे होताना काही दिसत नाही. वृत्तवाहिन्यांच्या पाठीवर राजकीय वरदहस्त असण्याचे आणि टीआरपी रेटिंगद्वारे या वाहिन्यांची चलती होण्याचे हे दिवस आहेत. अर्थात बिकाऊ वृत्त वाहिन्यांसाठी हे खूपच अच्छे दिन आहेत.मग विश्वास कसा ठेवायचा अशा वाहिन्यांवर? शक्यच नाही. शक्य असण्याचे कोणते कारणही नाही.

गमतीशीर बाब अशी की, नको तिथे आणि नको तेव्हां सर्वांच्याच माथी मारला जाणारा राष्ट्रवाद खूपच हास्यास्पद आहे.

एकदा एक कॉकेशियन डॉक्टर गोस्वामीच्या कचाट्यात सापडला. दिल्लीत एका सुपर बग विषयी गोस्वामी त्यास झाप झाप झापत होता. युक्तिवादाच्या नावावर वेड लागल्या सारखा त्याच्यावर तोंडसुख घेत होता, सारखा सारखा ओरडत होता,त्यास सळो की पळो करून सोडत होता. केवळ बग उद्भवले असल्याने त्या जागेला तसे नाव देण्यात आले असल्याचे डॉक्टर केविलवाण्या अवस्थेत सांगत होता. असे नामकरण करण्यामागे कोणताही राजकीय हेतू अथवा एजेंडा नसून केवळ वैद्यकीय कारण असल्याचे पोटतिडिकीने स्पष्ट करीत होता.

पण गोस्वामी ऐकायला मात्र ऐकायला तयार नव्हता, अक्षरशः त्याच्यावर तुटून पडला होता, सारखा ओरड करीत बरसत होता. शेवटी वैतागून तो डॉक्टर उठला, जिवाच्या आकांताने पळ काढू लागला.

मात्र अर्नब काही ऐकायला तयार नव्हता. तो मंच सोडून उठे पर्यंत त्याच्या मागे ओरडत धावण्याच्या तयारीत होता.

फक्त त्याच्या टाळक्यावर बंदूक ठेवून मान्य करायला लावायचेच काय ते बाकी राहिले होते.अशा प्रकारे ताळतंत्र सोडण्याची त्याची बरीच उदाहरणे आहेत. रिपब्लिकच्या वाहिनीवरील या पहिल्याच दृश्याने मला रशिया टुडेची आठवण करून दिली, ही वाहिनी खोटे बोल पण रेटून बोलचा साक्षात अविष्कार. खोट्याला खरे दाखविण्यात तरबेज क्रेमलिन समर्थित राज्याची प्रचारक म्हणजे ही वाहिनी.

रिपब्लिक टी व्ही. कडे प्रत्येक चौकटीत दाखविण्यासाठी रशीयन झेंडे फडकत नव्हते. त्यांनी रिपब्लिक वर जाहिरात दिली. हॉटस्टार वर लाखो प्रेक्षक म्हणण्यापेक्षा ग्राहकांसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी राष्ट्र ध्वजाचा वापर करण्याची अनैतिकता दातात बोट धरायला लावणारी आहे. कारण यातून व्यवसायवाढीसाठी, त्यातून नफेखोरी करण्यासाठी राष्ट्रीयत्वाचा वापर होत आहे. अर्थातच हा पैसा कमावण्यासाठी असलेला एक मोठा खेळ मांडलेला आहे. रिपब्लिक टी व्ही सुद्धा स्वार्थापोटी राष्ट्रीय प्रतीकाचा वापर करून घेत आहे.

स्वतःला नव्या भारताचा बुलंद आवाज असण्याचा दावा करणार्‍या माणसाचे हे कृत्य आहे. रिपब्लिक टी व्ही च्या जाहिरातीतून म्हणे प्रेक्षकांशी संवाद साधला जातो. त्यात जाहिरात कोणती आणि बातमी कोणती या रहस्याचा उलगडा मात्र प्रेक्षकांना होत नाही. एखाद्या विषयावर त्यांचा शोध म्हणजे केवळ कागदांवरच. त्यातून त्यांचे पॅनेलिस्ट एखादे स्फोटक व ठराविक लक्ष्य साधून जावई शोध लावीत असतात. यात ॲंकर स्वतः प्रत्येक विषयात निपुण आणि सर्वात जास्त हुशार आणि बाकी सगळे मूर्ख आहेत, असे भासविण्याचा बळजबरीचा प्रयत्न करीत असतो.

यातून तो पॅनलवर उपस्थित असलेल्या विरोधकांचा बिनधास्त पाणउतारा करीत असतो. शेवटी गर्वाचे घर खाली असते आणि अहंकार विनाशकारी असते , हे कटू वास्तव लवकरच या युवा पत्रकाराला कळेल, अशी आशा बाळगते. निश्चितच एक दिवस असा उजाडेल की, आपल्या देशाच्या जनतेला गंडविणार्‍या यां वृत्त वाहिन्या एवढे मोठे, कधीही भरून न निघणारे नुकसान करीत आहेत आणि चौथा स्तंभ जमिनीखाली गाडून टाकीत आहेत, याची जाणीव होईल,हा विश्वास.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments