Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखकंगनाचं बॉक्स ऑफिसवर आपटलेलं नाटक

कंगनाचं बॉक्स ऑफिसवर आपटलेलं नाटक

इंडियन वॉक ऑफ शेम, बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनावत…! बरं, सुशांत प्रकरणात वृत्त वाहिन्या आणि माध्यमांत म्हणजे एकदम फ्रंट लाइनवर! बिचार्‍याच्या अंत्य विधीला गेली होती का? तर नाही! त्याच्या कुटुंबीयांना भेटली होती का? तर अजिबात नाही!! एवढं कशाला. सुशांत जीवंत होता तेव्हां त्याच्या सोबत चित्रपट करण्यासाठी देखील नकार दिला. मग एवढा पुळका? कसा काय बुवा? तर प्रसिद्धी आणि दुसरं काय? आत्ताच काहीं दिवसांपूर्वीच स्वयंघोषित काका पुतण्या वादाविरोधाला भलतच स्फुरण चढलं होतं. आणि सुशांतसाठी यातूनच आलेला होता हा पुळका. बॉलीवुड तार्‍यांच्या विरोधातला हा स्कोअरच म्हणा. काही जणांना आणि एका वृत्त वाहिनीला हाताशी धरून सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एक जबरदस्त स्क्रिप्ट तयार करून त्याच्या विषयी पुळका असल्याची मस्त पैकी ॲक्टिंग करून झाशीच्या राणीनं मैदान मारलं. अख्ख्या महाराष्ट्राला शूटिंग स्पॉट समजून आपल्या डोळ्यातून भळाभळा वाहणारे अश्रू दाखवित आपण किती दुःखी कष्टी आणि पीडित आहोत, तसेच किती निर्भीड देखील आहोत, याचे बर्‍यापैकी प्रदर्शन करण्यात यशस्वी सुद्धा झाली. मात्र पडद्यावर दिसत असलेली ही पीडित, दुःखी कष्टी आणि हो, एकदम निर्भीड महिला खरं तर ती एक अभिनेत्री तर आहेच. शिवाय काय जबर अभिनय केलाय… की पडद्यामागे असलेलं वास्तव तात्काळ समजणं अवघडच होऊन बसलं. आता तर या बाईला वाय प्लस सारखी कडक सुरक्षा देण्यात आलेली आहे. तरी देखील तिला भीती वाटते म्हणे. नार सूड भावनेने उभी पेटल्या सारखं वागते आणि धडाधड हल्ले चढविते. अगदी मणिकर्णिका सारखे हल्ले. आणि हो! मणिकर्णिका वरुन आठवले. (आपले आठवले साहेब तर आहेतच सदैव तिच्या पाठीशी.) मणिकर्णिका प्रदर्शित होण्यापूर्वी एक पत्रकार परिषद झाली. यात विनाकारणच रणबीर कपूरला बाईंनी धारेवर धरलं होतं. का? तर म्हणे तो राजकारणावर बोलतच नाही. आता रणबीर कपूरला नसेल बोलायचं तर त्यात काय एवढं? पण या अभिनेत्री बाईंनी भलतच मनावर घेतलं. तेही नसती उठाठेव म्हणुन. खरं तर रणबीर एक मोठा, खूप प्रसिद्ध स्टार आहे. त्याचा अभिनय सुद्धा कमालीचा आहे. सर्वांनाच त्याच्या अभिनयाची भुरळ पडलेली आहे. मात्र त्याच्या कपाळावर दोषी असण्याची रेषा मारली.

कोविड-19 सारख्या जागतिक महामारीच्या काळात संपूर्ण बॉलीवुड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र पोलीस आणि प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मात्र विरोधी पक्ष भाजपला हे खपले नाही. मग काय झालं? इतर बॉलिवूड स्टार्स प्रमाणं कंगना रनावतचा सोयीस्कर वापर करून घेतला आणि राज्याचं वातावरण प्रदुषित करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपला याचा काही उपयोग झाल्याचं दिसत नाही. एकापाठोपाठ एक मनसुबे पत्त्यांच्या बंगल्यांसारखे कोसळत गेले. कंगना बाईंनी माननीय उद्धव ठाकरे यांचं समर्थन करणार्‍या बॉलिवूडच्या इतर स्टार्स आणि दिग्दर्शकांवर सुद्धा गरळ ओकायला सुरुवात केली तर दुसरीकडे राखी सावंत इत्यादींनी महाराष्ट्र सरकारचे समर्थन केले आणि कंगना बाई तोंडघशी पडल्या. हळू हळू सुशांत सिंग प्रकरण म्हणजे न्यायाचं प्रतिबिंबच होत गेलं जणू. कारण बिहार राज्यातील निवडणूका तोंडावर आल्या. दुसरीकडे शिवसेना आणि सेना नेत्यांना लक्ष्य करणं विरोधकांसाठी एवढं सोपं नव्हतं. त्यासाठी एवढा कांगावा करावाच लागला.

गैंगस्टर चित्रपटात पहिल्यांदा मी कंगनाला पाहिलं तेव्हां मला ती आणि तिचा अभिनय भलताच आवडला होता. करियरच्या अगदी सुरुवातीलाच आपल्या कौशल्याची तिनं चुणूक दाखवली होती. अतिशय निरागस चेहऱ्याची गुणी अभिनेत्री भासली होती. आदल्या दिवशीच आदित्य पंचोलीसह तिचा लिंकअप झाला आणि ती हेड लाइंस मध्ये झळकली. तिथंच मला वाटलं की तिचा वापर केला जातो. बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत नवशिक्या लोकांबरोबर असं होतच असतं. तिच्याबरोबरही हेच घडलं. आदित्य पंचोलीनं तिला मारहाण केली आणि कोंडून टाकलं, अशी तक्रार नंतर तिनं स्वतःच केली. ती फक्त सतरा वर्षांचीच बाला अबला असून आदित्य तिच्या वडीलांच्या वयाचा असल्याचंही तिनं ठासून सांगितलं. पोलिसात तक्रार देऊनही काही नाही झालं, असंही तिनं त्यावेळेस सांगितलं होतं.

मग तिचं लग्न ठरल्याची आणि तुटण्याचीही बातमी येऊन धडकली. काहीं दिवसानंतर ऋतिक रोशनशी संबंध जुळले, असंही सांगत सुटली. यावेळी सुद्धा बराचसा चमत्कार दाखवला या बाईनं. यावेळेसही माध्यमांना चांगलाच मसाला मिळाला होता. बाई उठसूठ खोटे आरोप लावत असल्याचं समजल्यावर प्रकरण थंड्या बसत्यात पडलं होतं. अशा यान त्या कारणांमुळे सतत हेड लाइंस मध्ये झळकत राहण्याची कला तिच्या अंगवळणी पडत गेली. प्रसिद्धीशिवाय तिला चैनच पडत नाही जणू. रंगून चित्रपटाच्या वेळी काका पुतण्या वाद सुरू केला. हे काम तसं मोठ्या डेअरिंगचं असल्यानं सगळ्यांनी तिची वाहवा केली. की लागलीच आपण पीड़ित असल्याचं कार्ड खेळायला तिनं सुरुवात केली. आता काका पुतण्या वाद हा खरोखरच त्यावेळी वाद होता, म्हणुन सर्वांनी तिची पाठ थोपटलीही होती आणि पाठ राखणही केली होती. नंतर ती चांगल्या चांगल्या फेमस लोकांचं तुणतुणं वाजवून गेली आणि मस्त पैकी प्रसिद्धी मिळवत गेली.

सुरुवातीला ती ट्विटरवर पोस्ट करीत होती. मात्र आपली बहीण रंगोलीच्या नावावर. तिच्या पूर्ण कुटुंबाचा दारोमदार तिच्याच पैशांवर आहे आणि म्हणुनच तिच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिम्मत नाही, असं ती म्हणत. कंगनाची बहीण रंगोली तिची बिझनेस मॅनेजर आहे, हे बर्‍याच जणांना माहीत नाही. तिच्या चित्रपटावर कुणी टीका केली की मग ती चवताळून उठते. आपल्या टीकाकारांना राष्ट्रविरोधी असण्याचा लेबल लावते. मी झाशीच्या राणीची भूमिका केली असल्यानं मी राष्ट्रीय नायिका आहे, असं ती म्हणते. आपण मोदींची पक्की समर्थक आहोत म्हणुन आपला प्रत्येक विरोधक हा मोदी विरोधक, राष्ट्र विरोधक असल्याचा भ्रम निर्माण करण्याचा ती सतत प्रयत्न करते. तिनं काका पुतण्या वादही उचलून धरलेला आहे. सगळ्या बॉलिवूड मध्येच हा वाद आहे. या आधारावर बॉलीवूड प्रवेश नक्की. पण त्यासाठी अभिनय क्षमता देखील असावी लागते. यावरच त्याचं नशीब सिद्ध होत असतं. ते काही करण जौहर किंवा कुण्या चित्रपट माफियाच्या हातात नसतं. याच करण जौहरनं तारा, सुतारिया, भूमि आणि इतरांना चित्रपटात घेतलं. काका पुतण्या वाद आहे, याचा अर्थ असा मुळीच नाही की याशिवाय बॉलिवूड मध्ये बाहेरच्यांना प्रवेशच मिळत नाही अगर कुणी यशस्वीच होऊ शकत नाही. शाहरुख खान, प्रियंका चोपड़ा, अनुष्का शर्मा, रणवीर सिंह, दीपिका इत्यादींनी कंगना सारखा काही काका पुतण्या वादाचा आधार घेतला नाही. उलट आपल्या अभिनयाच्या बळावर यशाचं शिखर गाठलं. कंगना यांच्या पासंगालाही बसत नाही. तसं पाहिलं तर कंगना खूप चांगली अभिनेत्री आहे, यात शंका नाही. अभिनयाची चांगली क्षमता तिच्यात आहे. मात्र अहंकार, खोटारडेपणा, त्यातही तिचा दंभ मात्र तिला सुखानं बसू देत नाही. आपण एक महिला आहोत आणि खूपच दुःखी, कष्टी आहोत, पीड़ित आहोत, असा भ्रम निर्माण करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असते. काही बिनसलं की लागलीच देशभक्तीची ढाल पुढे करते. प्रतिस्पर्ध्यांना आसमंत दाखविण्यासाठी अगदी खालच्या पातळीवर जाऊन पोचते. सगळे नाटक करून झाल्यावर, चांगला टी आर पी घेतल्यावर, मस्त कमाई करून घेतल्यावर, आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आसमंत दाखवणं झाल्यावर, राजकीय सूड घेतल्यावर आता म्हणते की मुंबई सोडणार. तिच्या भक्तीत आकंठ बुडालेले तिचे भक्त, तिचे चाहते भावूक नसतील झाले तर नवलच. होणारच. पाक व्याप्त काश्मीर पेक्षाही भयानक अवस्था झालेल्या मुंबईत बिचारीला काय काय सहन करावं लागतं, अशा या दुःखी, कष्टी, पीडित, देशभक्त झाशीची राणी आपल्याला अशी एकाकी सोडून जाते, असं व्यवस्थित नाटक रंगविल्यावर, अशा पोस्ट केल्यावर तर नक्कीच लोकांच्या भावना हेलावणारच. मात्र या वेळी तिचं भांडं फुटलं. तिचं नाटक बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलं. किमान आता तरी तिनं काही बोध घ्यावा, एवढीच अपेक्षा.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments