Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमनपाच्या आडमुठेपणाची दुर्गंधी!

मनपाच्या आडमुठेपणाची दुर्गंधी!

कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मनपाचा आडमुठेपणा समोर आला आहे. मुंबई महापालिकेचा स्वच्छता अभियानाचा फज्जा उडालेला असताना उपनगरातील बोरिवलीमधील अभिनव नगरजवळील काजूपाडा परिसरातील गिरिशिखर उच्चभ्रू निवासी संकुलाच्या छाताडावर पालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी तात्पुरती शौचालये उभी केली आहे. मनपाच्या बिनडोकपणामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. मनपा स्थानिकांच्या जीवाशी खेळत असून हा मनपाने ते तात्पुरती शौचालये तेथून उचलून फेकावे. शेवटी रहिवाशांनी सध्यातरी संयम बाळगलेला आहे. तेथील रहिवाशांनी  रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला तर बोरिवलीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ही वेळ येऊ दयायची नसेल तर मनपाने आता तरी ते शौचालये तेथून हलवावे.

बोरिवली (पूर्व) येथील अभिनव नगरजवळील काजूपाडा परिसरातील रस्त्याच्या एका बाजूला माहीमवाला चाळ ही बैठी घरे वजा झोपडपट्टी, तर दुसऱ्या बाजूूला उच्चभ्रूंच्या निवासी इमारती उभ्या आहेत. झोपडपट्टीतील शौचालयाची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पालिकेच्या आर-मध्य विभाग कार्यालयाने या शौचालयाच्या पुनर्बाधणीचे कंत्राट कंत्राटदाराला दिले आहे. शौचालय पाडल्यानंतर झोपडपट्टीवासीयांसाठी गिरीशिखर निवासी संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच पदपथावर तात्पुरती सहा शौचालये उभारण्यात आली. ही शौचालये मलवाहिन्यांशी जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु ठेकेदाराने तात्पुरत्या शौचालयासाठी जी जागा निवडली त्यामुळे आजूबाजुच्या लोकांना त्रासदायक ठरेल याचा विचार का केला नाही. मनपाने जो शहाणपणा केला तो संतापजनक आहे. मनपा आणि ठेकेदाराने तेथील रहिवशांचा विचार केला नाही का? तात्पुरती शौचालये उभी करुन काय साध्य केलं. या सर्व प्रकारामुळे रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक होईल याचा विचार का करण्यात आला नाही. हाच प्रश्न निर्माण होत आहे. सोसायटीने पालिकेच्या ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयाकडे तक्रार पाठवली. परंतु त्या तक्रारीचा फायदा काय? नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्यामुळे बोरिवलीतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मनपाने तात्पुरती शौचालये उभी करू नयेत, अशी मागणी करणारे पत्र गिरीशिखर बिल्डिंग ‘ए’ को-ऑप. हौसिंग सोसायटी आणि गिरीशिखर बिल्डिंग ‘बी’ को-ऑप. हौसिंग सोसायटीकडून फेब्रुवारीमध्ये पालिकेच्या ‘आर-मध्य’ विभाग कार्यालयाला पाठविण्यात आले होते. त्यावर निर्ढावलेल्या मनपा प्रशासनाने वेळेवरच काही निर्णय घेण्याची आवश्यकता होती. परंतु सुस्त आणि ढिम्म प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे रहिवाशांना नाईलाजास्तपणे आक्रमकपणा घ्यावा लागला. संकुलातील रहिवाशांकडून कडाडून विरोध होऊ लागला आहे. इतकेच नव्हे तर पालिकेने संकुलाच्या दारातील बस थांब्यालगतच ही शौचालये उभी केल्याने प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही शौचालये तात्काळ तेथून हलवावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांकडून देण्यात आला आहे.

इमारतीच्या दारातच मोठय़ा संख्येने रिक्षा उभ्या करण्यात येतात. त्यामुळे या भागाला रिक्षा थांब्याचे स्वरूप आले आहे. तसेच येथे बेस्ट उपक्रमाचा एक बस थांबाही आहे. पालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी बस थांब्याजवळच तात्पुरती शौचालये उभी केली आहेत. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी अनेक प्रवासी या बस थांब्यावर उभे असतात. अनेक जण रिक्षा पकडण्यासाठी येथे येत असतात. येथे शौचालय उभारल्यानंतर झोपडपट्टीवासीयांचीही तेथे वर्दळ वाढेल. त्यामुळे भविष्यात झोपडपट्टीवीसीय, सोसायटय़ांमधील रहिवासी आणि प्रवासी यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काजूपाड्यातील सुंदर स्वच्छ परिसरात मनपाने शौचालयांची दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये एवढीच माफक अपेक्षा.!

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments