Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा छाती बडवून प्रचंड गाजावाजा करण्यात आला, असे...

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा छाती बडवून प्रचंड गाजावाजा करण्यात आला, असे का?

Image Courtesy: Getty Images

गेल्या काही दिवसांपासून मानसिक आरोग्य जपण्यासंबंधी आणि आत्महत्या रोखण्यासाठी बरीच चर्चा होत आहे. एका अंदाजानुसार तसेच दर 40 सेकंदातला एक आत्महत्या होते. दर वर्षी सुमारे 8, 00000 लोक आत्महत्या करतात. साधारणपणे आपल्या भारतात 15 ते 39 वर्षे वयोगटातील तरुणांचे मृत्यू आत्महत्येतून झाल्याचे म्हटले जाते. सद्ध्या हे प्रमाण वाढत असून याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात 11.9% तर पश्चिम बंगालमध्ये 11% एवढे आहे. 2020 साली देशभरात लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतातील झालेल्या शेकडो आत्महत्या कोरोना मुळे झालेल्या नसून 19 मार्च ते 2 मे पर्यंत झालेल्या एकूण 338 मृत्यूंचा थेट संबंध लॉकडाऊनशी आहे. बॉलिवूड आणि प्रादेशिक चित्रपटातील अनेक कलाकारांनी फाशी घेऊन आपला जीव गमाविला. मात्र केवळ एका सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने हा विषय अधोरेखीत केला आणि चर्चा, वादविवाद व आंदोलनांना तोंड फुटले.

या घटनेला अवाढव्य महत्त्व देण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पैकी एक कारण म्हणजे ही घटना राजकिय पोळी भाजून घेण्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण सर्वजण दुर्लक्ष करीत आहोत आणि तो म्हणजे मानसिक आजार. यात धक्कादायक बाब म्हणजे, भारतात या रोगावर उपचार न घेणार्‍या रुग्णांमध्ये नैराश्य आढळून आले.

जागतिक आरोग्य संघटनेनेच्या विश्लेषणानुसार जगातील 18 % मानसिक रुग्ण एकट्या आपल्या भारतात असून ही संख्या तब्बल 5 कोटी 70 लाखांच्या घरात आहे. भारतातील आत्महत्येचे एक प्रमुख कारण ‘नैराश्य’ हे असून तरुण वयोगटातील भारतीयांच्या मृत्यूचे दुसर्‍या क्रमांकाचे प्रमुख कारण होय. तीव्र दुःख होणे, अतिशय उदास वाटणे, विनाकारणच आपण अपराधी असल्याची जाणीव निर्माण होणे , जगण्यातील रस संपल्यासारखे वाटणे, न्यूनगंड, वैफल्य व यां सारख्या इतर अनेक बाबींतून आत्महत्या होतात.

आपल्यांपैकी बहुतेकजण डोकेदुखी, ताप इत्यादी सारख्या आजारांवर औषधोपचार करतो. मात्र अशा आजारांमागे सुद्धा चिंता, तणावपूर्ण वातावरण, निराशा इत्यादी कारणे असू शकतात, याचा देखील विचार नक्कीच करावा. शिवाय आपले प्रश्न, अडचणी व समस्या आपल्या स्नेही, हित आप्तेष्टांना शेयर न करणे व परस्पर संवादाच्या माध्यमातून समस्यां न सोडविणे, यासारख्या बाबींमुळे देखील परिस्थिती चिघळत जाते.

भारतात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो सर्वसामान्य लोक अशा घटनांना बळी पडत आहेत. मात्र यां घटनांची सहसा दखल घेतली जात नाही. अशा परिस्थितीत मात्र सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा छाती बडवून प्रचंड गाजावाजा करण्यात आला, असे का? सर्वसामान्य मारतात, मारले जातात, मात्र आपण कधी हळहळतो का? यांच्या अशा अनाहूत अकाली अनैसर्गिक मृत्यूवर आपण कधी मोर्चे काढले का? एखाद्या बातमी वाहिनीवर चुकूनही चर्चा करण्यात आली का? हे आजच नसून गेल्या अनेक वर्षांपासून हे घडत आहे. मुख्य म्हणजे मुख्य मुद्द्याला बगल देत सर्वांनीच मुंबई पोलिस, राज्य सरकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिया चक्रवर्ती यांच्या मागे हात धुवून लागावे, हे काय गौडबंगाल आहे?

सुशांतची प्रेयसी रिया हिच्यावर टिकांची झोड उठत आहे. एखाद्या महिलेसाठी डायन, सोन्याच्या गुप्त धनावरील चेटकीण इत्यादी सारख्या शब्दांचा वापर करणे किती निंदनीय आहे. अशा प्रकारच्या टीकांचा सामना शक्य तरी असतो का? अशां वायफळ बाबींवर वेळ आणि ऊर्जा वाया न घालवता वास्तविक आणि खरोखरच महत्वपूर्ण असलेल्या मुद्द्यांना लक्ष्य करून कटू सत्य बाहेर काढावयास हवे.

आपण आपल्या शिक्षण आणि विवेक बुद्धीचा समाजात बदल घडविण्यासाठी भरपूर उपयोग करू शकतो. उदासीनता, मानसिक आजार, सामाजिक अन्याय व यां सारख्या इतर समस्त गंभीर विषयांवर चर्चा करणे आणि विशेष म्हणजे अशा मृत्यूमागील मूळ कारणांची यथायोग्य मीमांसा करणे ही निश्चितच काळाची गरज आहे.

अवास्तव निंदनीय व अपमानास्पद प्रसार प्रचार करण्यामागे कोणता एजेंडा राबविण्यात येत आहे, याचाही शोध घेणे आवश्यक आहे. दुर्दैवाने सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या पडद्याआडून रियावर हल्ला करून बर्‍याच जणांनी समाज माध्यमातून रान उठवले आणि प्रचंड प्रतिसाद देखील मिळविला. स्वस्त वा फुकटच्या प्रसिद्धीसाठी बर्‍याच जणांनी तसेच डाउन-मार्केट सेलिब्रिटी, व्यावसायिक आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या जळत्या चुलीवर भाकर भाजून घेतली. मृत व्यक्ती स्वतः व्यक्त होऊ शकत नाही,बोलू शकत नाही, म्हणून सर्वजण स्वत:ची स्क्रिप्ट लिहित आहेत. जणू काही सुशांत सिंग राजपूत स्वतः त्यांच्या स्वप्नात आला आणि त्या दिवशी सकाळी काय घडले ते सांगून गेला.

हे सर्व आत्मप्रसिद्धी साठी असलेले फाजील प्रयत्न असून असे स्टंट फार काळ टिकणार नाहीत. ते फक्त एक रंजक संभ्रमित दृश्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र काळानुसार हे सर्व काही क्षणभंगुर ठरेल. या वृत्तवाहिन्यांना नेहमीच नव नवीन विषयांची गरज असते. कारण त्यांचे अस्तित्वच मुळात टीआरपीवर टिकून असते. आज घडीला चोविस तास सुशांत आत्महत्या प्रकरणाचा ढोल बडविणार्‍या बर्‍याच वृत्त वाहिन्यांनी सुशांतचा विषय एखाद्या वापरून वापरून टाकाऊ झालेल्या वस्तु प्रमाणे अलगद बाजुला सारला. आता समाज माध्यमात सुद्धा कधी तरी क्वचितच या विषयाचे दर्शन होत असते. सुशांत प्रकरणापूर्वी देखिल अशी असंख्य प्रकरणे मुख्य बातम्यांच्या मथळ्याखाली गाजली आणि वाफेसारखी हवेत विरून गेली. आपणही बिनडोकपणे पाहत राहिलो, वेळ आणि पैसा वाया घालवत गेलो आणि माध्यमे याचा भरपूर फायदा घेत गेली.

या वाचाळ रणभूमीवर होत असलेल्या शाब्दिक युद्धामध्ये कोणाचाही विजय किंवा पराभव नसतो, आपला फायदा तर नक्कीच नसतो. हे केवळ पडद्यावरील अतिरंजक नाटक व मृगजळ असून आपण विनाकारण आपली उर्जा, वेळ आणि पैसा वाया घालवित असतो. कारण टी आर पी च्या रंगभूमीवरील पडद्यामागचे वास्तव काही निराळेच असते. सुशांतचा मृत्यू तुमच्याप्रमाणेच मलाही चटका लावुन गेला. नको होते हे घडायला. मात्र यापेक्षाही मोठे विडंबन ते पहा. जीया खान चा मृत्यू झाला, दिशा सालिआन चा मृत्यू झाला, श्रीदेवीचा मृत्यू झाला, दिव्या भारतीचा मृत्यू झाला, परवीन बॉबी चा मृत्यू झाला… असे इतरही बरेचजण अकाली गेले, मृत्यू पावले. मात्र कुठल्याही माध्यमांनी किंवा समाज माध्यम बहाद्दरांनी यांची हवी तशी दखल घेतली नाही. प्रश्न असा की, यांच्या जिवांना काहीच मोल नव्हते का? यांच्या प्रसंगी माध्यमात एवढा शुकशुकाट का होता? आणि आता मात्र एवढय़ा मोठय़ा प्रमाणात छाती बडवेपणा कशासाठी? याचा सद्सद्विवेकबुद्धीने तुम्हीच विचार करा. या प्रकरणातील त्या सर्व आरोपींवर योग्य कारवाई आणि वस्तुनिष्ठ तपास करून यामागील सत्य बाहेर आणण्यासाठी कोणते प्रश्न वा मुद्दे उपस्थित करावयास हवे? याचा आपण विचार केला पाहिजे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments