Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखबळीचा बकरा कोण? अनुराग कश्यप की पायल घोष?

बळीचा बकरा कोण? अनुराग कश्यप की पायल घोष?

payal ghosh, anurag kashyap, anurag, payal, sexual harassment, bollywood, nepotism

काहीं दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. अनुराग कश्यप वर मी-टू चा आरोप लावण्यात आला होता. लोकल चित्रपटाची छोटीशी नटी पायल घोष. ‘पटेल की पंजाबी शादी’ आणि एक टी व्ही वाहिनी ‘साथ निभाना साथिया’ सारख्या फ्लॉप चित्रपटात ती दिसली होती. ही नटी आज अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावीत आहे. अनुरागने तिच्यावर बळजबरी करीत बलात्काराचा प्रयत्न केला, असं ट्विट करीत डायरेक्ट डायरेक्ट तिनं पंतप्रधान यांनाच हाक दिली. घोष बाईंनी आरोप लावताच नेटकरी बाह्या सरसावत पुढं आले. चित्रपट निर्मात्याला तात्काळ अटक करण्याची मागणी उचलून धरली. इतक्यात आपली कंगना रनावत बाई सुद्धा पायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

हे प्रकरण कसं आणि कशासाठी उभं करण्यात आलं, हे अद्याप कुणालाच माहीत नाही. मात्र अनुराग गुपचूप बसलेला दिसतो. सद्ध्या तरी त्याचं तोंड बंद आहे. आपल्या देशातील काही प्रतिभाशाली दिग्दर्शकांपैकी एक अनुराग कश्यप आहे. गैंग्स ऑफ वासेपुर आणि ब्लैक फ्राइडे च्या निमित्ताने त्याच्यातली प्रतिभा सगळ्या देशाला भुरळ पाडणारी आहे. त्याचं दिग्दर्शन कौशल्य खरोखरच मानवी मनाला आवाहन करणारं आहे. आपल्या चित्रपटातून आधुनिक काळातील समाजाचे वेगवेगळे चेहरे आणि विविध पैलू स्पष्ट करण्यात त्याचा हातखंडा आहे. विविध मुद्द्यांना हाथ घालून यथार्थवादाचे मार्मिक चित्रण करण्याचे उत्तम कौशल्य त्याच्या अंगी आहे. आजही त्याच्या वजनाचे लोक चित्रपट सृष्टीत कमीच आहेत. आपल्या विशिष्ट शैलीने त्याचा जनमानसात एक जरा हटके प्रभाव आहे.

आपल्या वैयक्तीक आणि सामाजिक जीवनात आपले मत अत्यंत प्रभावीपणे व निर्भीडपणे मांडण्यात तो थोडाही कचरत नाही. त्याचं कौशल्यच त्याची व्याख्या करण्यासाठी पुरेसं आहे. दररोजचं सामान्य जीवन अधिक यथार्थपणे मांडण्यात आणि जीवनाचं कटू सत्य बाहेर आणण्यात तो खूप कुशल असून सद्ध्या तरी त्याला तोड नाही. आजकालच्या काही चित्रपटांनी त्याच्या नशिबाला साथ दिली नसली तरी तो एक उत्तम निर्माता व दिग्दर्शक असल्याचं कुणीही नाकारू शकत नाही. यां दिवसांत मात्र तो प्रतिगामी शक्तींच्या रडारवर आहे, हे आवर्जून नमूद करावसं वाटतं.

आजकाल बॉलिवूडच्या नटनट्यांत भाजपचं समर्थन करण्याचं एक फॅड निर्माण झालेलं आहे. काहीं जण भाजपचे सभासद देखील आहेत. आपले अनुपम खेर, किरण खेर, मधुर भांडारकर, विवेक अग्निहोत्री, परेश रावल, हेमा मालिनी, रवीना टंडन, कंगना बाई रनावत इत्यादी बरेच जण भाजपच्या छत्रछायेखाली जगतात, भाजपच्या समर्थनात डायलॉग्ज मारतात, अभिनय पणाला लावतात. आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध अभिनेता, खिलाडियों का खिलाड़ी, इंटरनेशनल खिलाड़ीफेम अक्षय कुमार वर भाजपला पूरक असलेले वा भाजपला वैचारीक फायदा पोचविणारे चित्रपट करण्याचा आरोप लावला जात आहे. बॉलीवूडमध्ये विविध प्रकारच्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यात येतं. बॉलीवूड मधील काही लोक भाजपचं समर्थन करीत असले तरी बरेचजण विरोधही करतात. बॉलीवूडच्या शंभर लोकांपैकी बर्‍याच जणांची विचारधारा परस्पर भिन्न दिसून येते. बॉलिवूड मधील लोक सामान्यतः खूप काही बुद्धिजीवी वगैरे असतात, अशातलाही भाग नाही. तशी कुणी अपेक्षाही करण्याची गरज नाही. त्यांच्यातील बर्‍याच जणांना भारताच्या राष्ट्रपतींचे नाव देखील माहित नाही. याउलट काहीजण तर चक्क वृत्तपत्रात एखाद्या विचारवंता प्रमाणं लेख सुद्धा लिहितात. तेव्हा कुणास किती सीरीयस घ्यायचं, किती गंभीरपणे घ्यायचं, याचा बराच सारासार विचार करण्याची गरज असते. मात्र ते नटनट्या असल्याने आणि सर्वांनाच वेड लावणार्‍या चंदेरी दुनियेचे तारे असल्याने लोक त्यांच्या बोलण्याचा गांभीर्याने विचार करीत असतात. चित्रपटात दिसत असलेल्या त्यांच्या डायलॉगबाजीने प्रभावित होत असतात.

अनुराग कश्यपने भाजप आणि हिंदुत्ववादी शक्तींना बर्‍याच दिवसांपासून धारेवर धरलं होतं. त्यावेळेस मायक्रोब्लॉग साइट्स वर प्रचंड गदारोळ माजला होता. प्रत्युत्तरादाखल भाजपच्या समर्थनार्थ अनुरागला चांगलच लक्ष्य केलं होतं. खरं तर कलात्मक, बौद्धिक आणि वैज्ञानिक स्वभावाच्या सीमा वर्तुळातील अधिकाधिक वा बहुसंख्य लोक सरकार आणि सरकारच्या समर्थकांच्या विरोधात बोलणार्‍यांच्या व टीका करणाऱ्यांच्या श्रेणीत मोडतात. असो. थोड्यावेळाकरिता आपण बॉलिवूडमधील डावा उजवा वाद बाजुला ठेवुया. सद्ध्या आपण अनुराग कश्यप बद्दल बोलुया.

मी काही त्याची प्रशंसा अगर समर्थन करीत नाही. तो एक वस्तुनिष्ठ दिग्दर्शक आहे. चांगला हाडाचा कलाकार आहे. अशा प्रकारच्या कलाकाराचा विचार देखील एखाद्या वैज्ञानिका प्रमाणेच रचनात्मक आणि वस्तुनिष्ठ असतो. कुण्या काळचे रचनाकार कदाचीत रुढ़िवादी वा परंपरावादी असतीलही. मात्र सर्वच तसे नसतात. अशा प्रकारचे रचनात्मक कलाकार रूढ़िवादी नसून उदारमतवादीच जास्त असतात. असे कलाकार प्रस्थापित रुढ़िवादी व्यवस्थेविरुद्ध सतत पेटून उठलेले असतात. आपल्या देशात सत्तारूढ पक्ष भाजप हा पूर्णतः रुढ़िवादी असल्याने अनुराग कश्यप त्यास चांगलाच झोंबला, जिव्हारी लागला. बॉलीवूड नटनटीं मध्ये स्वस्त प्रसिद्धीसाठी आसुसलेल्यां पैकी कंगना रनावत बाई सुद्धा आहेत आणि त्या भाजपच्या समर्थक आहेत, हे वारंवार सिद्ध झालं आहे. आपलं राजकिय भवितव्य सुरक्षित करण्याच्या तयारीत बाई जोरदार प्रयत्न करीत आहेत, असं दिसतं. बाईंना 2024 च्या निवडणुकांचे डोहाळे लागलेले दिसत आहे. भाजपने शिवसेनेचा घरोबा मोडला असल्यानं बाईंनी एवढं मोठं नाटक केलं असल्याचं दिसतं. आता तिच्याकडं दुर्लक्ष करण्याची वेळ आली आहे.

आता एक आणखीन प्रश्न उरला. तो म्हणजे या डाव्या विचारसरणीच्या फिल्मी ताऱ्यांना संपविण्याची सुपारी आणखीन कोण कोण जणांनी घेतली, त्याचा शोध लावण्यात यावा. शिवाय खरोखरच जर एखाद्या अभिनेत्री बरोबर चुकीचा व्यवहार होत असल तर निश्चितच याची शिक्षा मिळायलाच हवी. मात्र आरोपात किती तथ्य आहे, हे तपासून पाहणे देखिल गरजेचे आहे. मात्र जर भाजपवर आणि मोदी व त्यांच्या समर्थकांवर टीका केल्याचा सूड उगविण्यासाठी हे सर्व आरोप करण्यात येत असतील तर मात्र अवघड आहे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments