Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसमाजविघातक शक्तींचा कुटील डाव!

समाजविघातक शक्तींचा कुटील डाव!

शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात भिमा कोरेगावचे निमित्त करुन समाजा-समाजात फूट पाडणा-या समाजविघातक शक्तींनी काही माथेफिरु तरुणांना हाताशी धरुन गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात नंगानाच सुरु केला आहे. हा नंगानाच करण्यासाठी राजकीय अदृश्य हात त्यांच्या पाठिशी असल्याशिवाय एवढा माज त्या माथेफिरुंना येऊ शकत नाही. दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तीचा डाव आहे. राज्यात,देशात काही जातीयवादी शक्ती तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. भीमा कोरेगावची घटना अचानक घडलेली नाही. दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगाव येथे हजारो लोक येतात अभिवादन करतात. यंदा २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोक मोठ्या संख्येने येणार होते. पोलीस प्रशासनाला याची पूर्ण कल्पना होती. आरएसएसशी संबंधित लोकांनी चार पाच दिवसांपासून या परिसरात अफवा पसरवून परिस्थीती बिघडवण्याचे काम करत होते. याची पूर्ण कल्पना असतानाही पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत वा पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळेच पुण्यातून आलेल्या काही समाजकंठकांनी हैदोस घालून हिंसाचार केला आणि पोलिसांनी काहीही कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली.असा आरोप होत असेल तर ते तपासणे गरजेचे आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात जाळपोळ,तोडफोड,दुकानांची लूट,एटीएम फोडणे,दगडफेक सारख्या घटना घडत आहेत. सोमवारी तोडफोड घडल्यानंतर पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर मंगळवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली नसती. काही बोलबच्चन नेते,मंत्री,जातीयवादी संघटनांशी संबंधित नेते हे वादग्रस्त विधान करतात परंतु सरकारची कृपा असल्यामुळे कारवाई होत नाही. अशा प्रवृत्तींना वेळेवर ढेचून काढणे गरजेचे आहे. वादगस्त विधानांमुळे तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र ठरवून केले जात आहे. भीमा कोरेगाव येथे जो प्रकार घडला तो अचानक घडला नसून तो ठरवून करण्यात आला आहे. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. परंतु या घटनेमागे जी डोकी होती ते शोधून काढण्याचे पोलिसांचे काम आहे. पंरतु सरकारचे बगलबच्यांवर या संपूर्ण घटनेत शामिल होण्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनांचे मास्टरमाईंड कोण आहेत ते पकडल्या जाणार नाहीत. महाराष्ट्रात देशात समाजा-समाजामध्ये असेच प्रकार होत राहतील तर हा देश कधीच महासत्ता बनणार नाही आणि दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. मात्र राज्यांचे आणि देशाचे तुकडे होणार नाही याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. परंतु दोन दिवसात सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे जे काही नुकसान झाले त्याचे काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. ज्या वेळी काही घटना घडतात त्यावेळी चौकशीचे आश्वासन दिले जातात परंतु नंतर त्याचा काहीच निकाल समोर येत नाही. जे दोषी असतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. जर मस्तवाल पणा करणाऱ्यांना शोधून काढले आणि त्यांच्या नांग्या ढेचून काढल्या तर पुन्हा राज्यात गोंधळ घालण्याची कुणाची हिंमत होणार नाही. परंतु राजकीय दुकानदारी चालविण्यासाठी सर्वांना पाठिशी घातले जाते. परंतु हे देशाच्या एकतेसाठी,अखंडतेसाठी धोक्याचे आहे. राजकीय नेते समाजात तेढ निर्माण करणारे विधान करुन दंगली भडकविण्याचे काम करत आहेत. सरकारने  या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला मानणा-या सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटील राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्यकता आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments