भाजपाची खरेदी विक्री!

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना यांना भाजपात येण्याची ऑफर देण्यात आली. जाधवसह २५ आमदारांना प्रवेशासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयाची ऑफर दस्तरखुद्द भाजपाचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. असा खळबळजनक आरोप आमदार जाधव यांनी केला. प्रत्येकी ५ कोटी म्हणजे २५ आमदारांचा तो आकडा सव्वाशे कोटी च्या घरात गेला असता. एवढा पैसा भाजपाकडून आला कोठून हा खरा प्रश्न आहे. आमदार जाधव यांनी आरोप केला की,मागच्या महिण्यात चंद्रकांत पाटील यांनी भाजपात प्रवेशाची ऑफर दिली होती. विधानसभेत भाजपाचे १२२ तर शिवसेनेचे ६४ आमदार आहेत. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर सरकार कोसळेल. शिवसेना कधी काय भूमिका घेईल याची चिंता भाजपाला सतावत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडन फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते. जर शिवसेना आमदार फुटले असते तर राज्यात खूपमोठी उलथापालथ झाली असती. भाजपाने फोडाफोडीच्या मुद्यावरुन आमदार जाधव यांचे आरोप फेटाळून लावले. आरोप प्रत्यारोप होत राहतील. एकीकडे राज्याची अवस्था अत्यंत बिकट असतांना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जर लोकप्रतिनिधींची खरेदी विक्री होत असेल तर लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक आहे. काही दिवसांपूर्वी, भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला होता. ”यातील १० लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित ९० लाख रुपये सोमवारी २३ ऑक्टोबर देण्यात येणार होते”, असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी मागच्या महिण्यात केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केले होते. गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते असलेले वरुण पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिली, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला होता. भाजपाकडे सर्वात जास्त पैसा असल्याचा अहवाल जाहीर करण्यात आला. भाजपाकडे सर्वच राजकीय पक्षांपेक्षा जास्त पैसा असल्यामुळे व सत्तेत सहभागी असल्यामुळे त्यांचा खरेदी विक्रिचा राजकीय खेळ जोरात सुरु आहे असेच यावरुन सिध्द होते. जर पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर सत्ताधारी पक्ष भाजपा खरेदी विक्रीचा राजकीय खेळत असेल तर तो लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.

- Advertisement -