Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभाजपाची ‘नीच’ खेळी अंगलट!

भाजपाची ‘नीच’ खेळी अंगलट!

भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘खोट बोल पण रेटून बोल’ अशी ओळख असलेला पक्ष आज 2G च्या निकालावरुन तोंडघशी पडला. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असतांना सत्ता हस्तगत करण्यासाठी घोटाळा झाल्याची ओरड करुन ‘नीच’ राजकारण केले. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 2G घोटाळ्यातले मुख्य आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए. राजा तसंच द्रमुकच्या राज्यसभा सदस्या कनिमोळी यांच्यासोबतच सर्व १७ लोकांची निर्दोष सुटका केली. म्हणतात ना ‘‘सत्य परेशान हो सकता है पराजीत नही” आजच्या निकालावरुनही तसच झालं. यूपीए सरकारच्या काळात झालेल्या या स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात देशाच्या तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. तत्कालीन विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने सरकारविरोधात केवळ संसदेतच नव्हे तर सर्व देशात, तत्कालीन युपीए सरकार विरोधात आंदोलने आणि विरोध प्रदर्शन केले होते. द्रमुक पक्षाचीही या महाघोटाळ्यामुळे मोठी नाचक्की झाली होती. 2G स्पेक्ट्रम प्रकरण हे २००८ मध्ये झाले होते तरी २०१० मध्ये त्याच्यावरुन रणकंदन माजवण्यात आले. तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला तर त्यांची जेलमध्ये रवानगीही झाली होती. द्रमुकच्या खासदार आणि करुणानिधींच्या कन्या कनिमोळी यांनाही अटक होऊन जेलची शिक्षा भोगावी लागली. या प्रकरणाचे मोठ्या प्रमाणावर राजकीय पडसाद उमटले होते. याचा सगळ्यांत मोठा फटका यूपीए सरकारच्या विश्वासार्हतेला बसला होता. यूपीए सरकारबरोबरच मनमोहन सिंग यांची प्रतिमा यामुळे मलीन झाली होती. पंतप्रधानांच्या नाकाखाली इतका मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे ते सर्वांत भ्रष्ट सरकार चालवत असल्याची टीका त्यांच्यावर झाली. म्हणूनच नंतरच्या निवडणुकीत हा मुद्दा लावून धरण्यात विरोधक यशस्वी झाले. इतकंच नाही तर, कॉमनवेल्थ घोटाळा, 2G घोटाळा आणि कोळसा घोटाळ्यामुळे यूपीए सरकारनं आणणेल्या सर्व कल्याणकारी योजना मागे पडून हे घोटाळेबाजांचं सरकार आहे अशी प्रतिमा तयार होण्यास मदत झाली होती.” विरोधकांच्या खोट्या आरोपांचा घोटाळा झाला असं वाटतयं. कोणत्याही पुराव्याशिवाय युपीए सरकारवर निराधार आरोप करण्यात आले होते हे सिध्द झाले. तत्कालीन कॅग प्रमुख विनोद राय यांनी काँग्रेस सरकारविरोधात षडयंत्र रचून कुणासाठी काम करत होते याचाही सोक्षमोक्ष लागाला पाहिजे. माजी कॅग प्रमुख विनोद राय यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली. सध्या विनोद राय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख आहेत.  त्यांनी तर या संपूर्ण प्रकरणी माफी मागायला हवी. परंतु राय असे करणार नाही कारण त्यांनी सुपारी घेऊन आरोप केले असतील तर तोंडात बोळा घालून तमाशा बघतील. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात ज्यावेळी होता तेव्हा पासून आता पर्यंत भाजपाचे सर्व नेते 2G प्रकरणावरुन राजकीय भांडवल करीत होते. या भांडवलाचा त्यांना २०१४ मध्ये मोठा फायदाही झाला. नेहमीच ही मंडळी काँग्रेस सरकारने 2G घोटाळा केला असे ढोल बदडत होते. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे किती ‘नीच’ राजकारण करत होते आजच्या निकालावरुन स्पष्ट झाले.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments