Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखशेतकऱ्यांची हळहळ बेचिराख करेल!

शेतकऱ्यांची हळहळ बेचिराख करेल!

शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला भाजपा खासदार पुनम महाजन यांनी शहरी माओवाद डोकावतो असं विधान करुन बदनाम करण्याच पाप केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर हद्दच केली. लाँग मार्चमध्ये ९५ टक्के शेतकरी नव्हते.अस सर्टीफिकेट देऊन टाकल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा शेतकऱ्यांबद्दल अकलेचे तारे तोडले. बिनडोक दानवे यांनी तर हा मोर्चा शेतकऱ्यांचा नव्हता असं विधान करुन आपली लायकी दाखवुन दिली. या दानवेंनी काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना कितीही दिल तर रडतातच ‘साले’ असं संतापजनक विधान केल होत.पण यांना त्या वृध्द शेतकऱ्यांच्या पायाचे गोळे सोलून गेलेले पाय दिसत नाही. कारण सत्तेच्या धुंदीत सरकार आंधळ,मुकं आणि बहीर झालेल आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे हाल दिसणार नाही. क्रांतीची हीच मशाल हाती घेऊन आझाद मैदानावर कृषक, आदिवासींनी एल्गार केला. मैदानावर सोमवारी लाल रंगाची झालर चढविले गेले असल्याचे दृश्य होते. हा लाल रंग केवळ क्रांतीचाच नव्हता तर निर्लज्ज सरकारच्या अन्यायामुळे बळी गेलेल्या कृषकांचा, कष्टकऱ्यांच्या रक्ताचा देखील असल्याचा हा भास होता. इथं आलेल्या प्रत्येक शेतकरी आणि आदिवासींच्या डोळ्यात सत्तेच्या विरोधात अनास्था प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणवत होती. दोनशे, मीटर लांबून आलेल्या शेतकऱ्यांच्यांचे झिजलेल्या चपला, पायाला आलेले गोळे हे काही कमी नाही. आपल्या हक्कांसाठी सलग ६ दिवस शेकडो किलोमीटरचा खडतर प्रवास करत आलेल्या लाल वादळाने आझाद मैदान फुलून गेले होते. कष्टकऱ्यांचे ऋण जो विसरला तो महाराष्ट्राचा दुश्मन मानावा लागेल. शेतकरी पिचला आहे, रोज आत्महत्या करतो आहे. सूर्य उगवताना आणि मावळताना रोज एक नवे संकट त्याच्या छाताडावर नाचत आहे. सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली, पण ही कर्जमुक्ती फसवी आहे. हजारो, लाखो शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहेत. कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही व राजकीय लाभासाठी फक्त जाहिरातबाजी झाली. सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार फक्त तोंडाला पाने पुसत आहे. अर्थसंकल्पात शेतकऱयांच्या नावाने फक्त घोषणांची बोंब मारण्यात आली. ना कर्जमाफी ना नुकसान भरपाई. शेतकरी मोठ्य़ा संख्येने आत्महत्येच्या मार्गावरून निघाला आहे व त्याने क्रांतीची ठिणगीच टाकली आहे. शेतकऱ्यांनी आधी संप पुकारला. आता सरकारचा निषेध करण्यासाठी आज मोर्चा काढला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींचे काय झाले? शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचे काय झाले? कसेल त्याची जमीन हा कायदा असेल तर मग कसत असलेल्या वन जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर का होत नाहीत? आदिवासी शेतकरी जंगलात राहतो व वन जमिनींचे रक्षण करतो. त्या जमिनी आदिवासींच्या नावावर केल्या तर सरकारला काय फरक पडणार आहे. असे एक ना अनेक प्रश्न घेऊन शेतकरी उन्हात मुंबईत आला होता. शेतकऱ्यांच्या मागण्या व गरजा फार नाहीत. त्यांना फक्त सुखाने जगण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. शेतकरी व कामगारांच्या जीवनाची राखरांगोळी होत चालली आहे. अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करून सरकारने कष्टकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले. ‘जय किसान’चा नारा देत हजारो शेतकरी मुंबईत धडकले होते. परंतु त्यांना आश्वासनाच गाजर देऊन सरकार मोकळ झालय. निर्लज्ज सरकारच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी त्यांचा अपमान केला शेतकऱ्यांच्या मोर्चाला नक्षलवाद्यांशी जोडल. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments