मुख्यमंत्र्यांचीही टरकली!

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०१९ च्या पराभवाची चिंता भेडसावत आहे. शिवसेनेने स्वबळाचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यासह त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांची अवस्था वाईट झाली. नेहमीच ओरडून ओरडून घसा बसेपर्यंत ‘बोलबच्चन’ मुख्यमंत्री फडणवीस फुशारक्या मारतांना आपण बघितले. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळाच्या त्यांचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपाने आतापासूनच पराभव मानला आहे. ‘राष्ट्रवादाची’ हाक मारुन इतरांना मुर्ख बनविण्याचे कामही भाजपाच्या मंडळीने चालू केले. भाजपा,संघ परिवाराकडून नेहमीच राष्ट्रवादाचे सर्टीफिकेट वाटले जातात. आताही त्यांनी तोच पवित्रा कायम ठेवत शिवसेनेबाबत हीच भाषा वापरली. मुख्यमंत्री दस्तुरखुद्द म्हणाले की, शिवसेनेला स्वबळावर लढून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत करायची की ‘राष्ट्रवादावर’? श्रद्धा असलेल्या भाजपासोबत राहायचे. याचा विचार शिवसेनेने करावा. राष्ट्रवादाचे सर्टीफीकेट वाटण्यात ही मंडळी पटाईत आहेत. स्वत:च्या पक्षाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादाचा सर्टीफिकेट देऊन टाकला. शिवसेनेने लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर त्यावर एवढी आगपाखड कशासाठी? एकीकडे शतप्रतिशत भाजपाच्या गप्पा मारतात. मात्र शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्यानंतर एवढे घाबरण्याचे कारण काय? शिवसेना स्वबळावर लढल्यास नुकसान केवळ भाजपाचे होणार नाही. शिवसेनेचे नुकसान अधिक होईल. जर स्वबळावर शिवसेनेला लढायचे असेल आणि त्यांची ताकद दाखवावायची असेल तर इतरांनी घाबरण्याचे कारण नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत लढत असतील तर आपला पराभव अटळ आहे हे आजच भाजपाने मान्य केले आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यामुळे शिवसेनेला आत्मविश्वास आहे की त्यांना यश मिळेल. जर २०१४ मध्ये शिवसेना,भाजपा वेगवेगळे लढले होते तर आता भाजपाला घाबरण्याची गरज काय? केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे आणि भाजपा खूप चांगले काम करत असेल तर त्यांना इतर कुणाच्या कुबड्यांची गरज का? त्यांनी स्वबळावर भाजपाची सत्ता आणावी. एकीकडे शतप्रतिशत अशी ओरड मारायची आणि दुसरीकडे शिवसेनेने समोर लाचारी पत्कारायची याचाच अर्थ आयत्या बिळावर नागोबा असाच प्रकार आहे. शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. तरुण मतदार हा मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षित होतो. आता पर्यंत शिवसेनेसोबत संसार केलेल्या भाजपाला शिवसेना हा मोठा भाऊ वाटत होता. परंतु २०१४ च्या निकालानंतर भाजपाच्या मंडळींची भाषाच बदलली. त्यामुळे शिवसेनेनेही आपला पवित्रा बदलून हम किसीसे कम नाही हेच त्यांनी दाखवून दिले. शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणारच असा चंग बांधला. मात्र शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपा आणि त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टरकली एवढे मात्र निश्चित.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

- Advertisement -